अलिबाग : थेरोंडा फाटा येथे गांजा पकडला; एकाला अटक

By Raigad Times    02-Mar-2021
Total Views |
cannabis_seized_LCB Raiga 
 
  • 8 किलो गांजा हस्तगत
  • रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
महेंद्र खैरे/रेवदंडा । अलिबाग तालुक्यातील थेरोंडा फाटा येथून 8 किलो 400 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून ही कारवाई केली.
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मिळालेल्या खबरीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.नावले व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले आणि थेरोंडा फाटा येथे छापा टाकला. यावेळी आशिष नंदकुमार तळेकर (वय 50, रा. थेरोंडा, ता. अलिबाग) याला ताब्यात घेण्यात आले.
 
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 8 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ व 750 रुपये रोख असा 1 लाख 1 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर मुद्देमाल जप्त करुन आशिष तळेकर विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एन.डी.पी.एस. अधिनियम 1985, 8(सी), 20 (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चिमडा हे करत आहेत.
 
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पेालीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.नावले, सहायक फौजदार राजेंद्र मांडे, पोलीस हवालदार राजेश पाटील, अजय मोहिते, अमोल हंबिर, महिला पेालीस नाईक संजीवनी म्हात्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.