पेण : अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या विवाहित तरुणाला बेड्या

By Raigad Times    02-Mar-2021
Total Views |
Crime News Raigad_1  
 
पुण्यातून घेतले ताब्यात; गुन्हा दाखल
पेण पोलिसांची कारवाई
 
पेण । पेण शहरातील फणसडोंगरी येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या 27 वर्षीय विवाहित तरुणाला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण शहरातील फणसडोंगरी येथे राहणार्‍या सोळा वर्षीय मुलीला याच परिसरात राहणार्‍या व विवाहित असणार्‍या आनंद (वय 27) नामक तरुणाने 23 फेब्रुवारीला फूस लावून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या पालकांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
 
आनंदने आपला मोबाईल पेणमध्येच बंद केला होता. मात्र कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे यांनी कोणताही पुरावा उपलब्ध नसताना मोठ्या शिताफीने तपास केला. त्याच्या मित्रांकडून तो पुणे येथील हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार उपनिरीक्षक मीनल शिंदे यांनी चाकण-पुणे येथून त्याला मुलीसह ताब्यात घेतले.
 
याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 363, 376 व पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
दरम्यान, कोणताही पुरावा नसताना महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कामगिरीचे पेणमधून कौतुक केले जात आहे.