रायगड : पूर्ववैमनस्यातून वृद्धाची हत्या; खुनी अटकेत

By Raigad Times    19-Mar-2021
Total Views |
Murder_Crime News_Raigad_
 
म्हसळा तालुक्यातील बनोटी येथील घटना
 
म्हसळा । म्हसळा तालुक्यातील बनोटी येथे पूर्ववैमनस्यातून 68 वर्षीय वृद्धाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे.
 
बुधवारी (17 मार्च) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बनोटी येथे राहणार्‍या गोविंद नागू नाक्ती (वय 68, रा.बनोटी, ता. म्हसळा) यांची शेजारी राहणार्‍या तरुणाने हत्या केली. गोविंद नाक्ती हे त्यांच्या घराच्या पाठीमागील परिसरात असताना, मागील भांडणाचा राग मनात धरुन खुनी तरुणाने ‘तू मला विनाकारण मारलेस’ असे बोलून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोविंद नाक्ती यांचा मृत्यू झाला.
 
या घटनेची फिर्याद गोविंद नाक्ती यांच्या मुलाने म्हसळा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत, गुरुवारी 18 मार्च रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे करीत आहेत.