.

आदिवासी कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून विझवला वणवा
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यातील जंगलभाग, रान माळ, डोंगर पठारावर दैनंदिन वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वणवे कसे लागतात? याबाबत कोणतीही स्पष्टता समोर येत नसल्याने चिंता व्यक्त होतेय. या वणव्याच्या अग्नि ज्वाळांनी वनसंपदा नष्ट होताना दिसत आहे. येथील खेमवाडी परिसरात लागलेल्या वणव्याने शेतकर्यांसह ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडवून दिली. या वणव्यात पेंढा, शेतातील राब जळून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.
आदिवासी समाज बांधव व कार्यकर्त्यांनी समयसूचकता राखत शर्तीच्या प्रयत्नांनी जीव धोक्यात घालून दोन किमीपर्यंत भडकलेला वणवा नियंत्रणात आणला. अशाप्रकारचे वणवे शेतकर्यांच्या मुळावर उठत असून हे वणवे परवडणारे नसल्याचे शेतकर्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी हे वाढते वणवे रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
वन विभाग व तालुका प्रशासनाने वणवे रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्ली संलग्नचे कोकण संघटक रमेश पवार यांनी केली आहे.
-----------------------------------------------------------------------------
वणवे लागण्याची विविध कारणे आहेत. राब भाजताना वार्याने ठिणगी इतरत्र उडून वणवा भडकतो, तसेच शिकारीसाठीदेखील वणवे लावले जातात. अशातच वणवे नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. ज्याठिकाणी वणवा लागला असेल , त्या ठिकाणची माहिती मिळाल्यास 'फायर ब्लो 'च्या मदतीने वन कर्मचारी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवतात .नागरिकांनी वणवे रोखण्यासाठी वन विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
- समीर शिंदे,
वनक्षेत्रपाल ,पाली सुधागड