माणगावात दिवसाढवळ्या पथदिव्यांचा लखलखाट

01 Mar 2021 13:45:33
Mangaon Street light_1&nb
 
महावितरणचे दुर्लक्ष; नगरपंचायतीला पडतोय भुर्दंड
 
माणगाव । माणगाव नगरपंचायत हद्दीत गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने दिवसाढवळ्या पथदिवे चालू ठेवण्यात येत असून याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले असून याचा वीज बिलाच्या रूपाने भुर्दंड मात्र माणगाव नगरपंचायतीला पडतो आहे. महावितरणाच्या या कारभारामुळे नगरीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
 
माणगाव नगरीत रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा असणारी पथदिवे चालू करण्यात येतात. मात्र दिवस उजाडल्यावर हे पथदिवे बंद केले जात नाहीत. गेली तीन ते चार महिने हा प्रकार माणगाव नगरीत सुरू आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी अनेकदा माणगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी हे पथदिवे बंद करण्याचे काम नगरपंचायतीकडे नसून महावितरण कंपनीकडे आहे.
 
त्यांनी याबाबत लक्ष देणे जरुरीचे असल्याचे सांगत त्यांच्या दुर्लक्षपणामुळे नगरपंचायतीला बिलांचा भुर्दंड पडत असल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले. रविवार दि.28 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 4:30 वाजता हे पथदिवे बंद करण्यात आले. याकडे माणगाव नगरपंचायतीनेही जातीने लक्ष द्यावे अशी मागणीही हद्दीतील ग्रामस्थांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0