रायगड : खवले मांजराची तस्करी करणारे तिघे गजाआड

09 Feb 2021 17:25:42
smuggling_1  H
  
  • पोलादपूरातील कशेडी घाटात वन विभागाची कारवाई
  • रिक्षामधून विक्रीसाठी नेताना पकडले
शैलेश पालकर/पोलादपूर । रिक्षामधून खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या तिघांना वन विभागाने गजाआड केले आहे. सोमवारी (8 जानेवारी) सायंकाळी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव खुर्द हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोत्यामध्ये खवल्या मांजर मादी आढळून आली.
 
सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोकणातील चिपळूण तालुक्यातून एका रिक्षेमधून वन्यजीवांची तस्करी केली जात असल्याची माहिती रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांना गुप्त माहितगारांकडून प्राप्त झाली. यानुसार वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश वाहन चालक राजेश लोखंडे आदी अधीनिस्त स्टाफसह मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर कशेडी घाटातील भोगाव खुर्द गावातील हद्दीत तैनात राहिले.
 
यावेळी खवल्या मांजराची मादी एका पिल्लासह पोत्यात भरून रिक्षा (क्र.एमएच08 एक्यू 4441) मधून विक्रीसाठी नेत असताना आढळून आली. यावेळी छापा घालून तिघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. या तस्करीप्रकरणी चिपळूण तालुक्यातील कालुस्ते गावांतील रिक्षा चालक-मालक नरेश प्रकाश कदम, चिवेली येथील सागर श्रीकृष्ण तसेच वाघिवडे येथील सिकंदर भाई साबळे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुध्द भारतीय वन्यजीव संरक्षणअधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वन्यजीवांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
 
या कारवाईसाठी महाड वनपरिक्षेत्रातील वनरक्षक दिलीप जंगम, शरद धायगुडे, संदिप परदेशी, रोहिदास पाटील, पवार, गौतम इहावळे, मच्छिंद्र देवरे, प्रकाश जाधव, नवनाथ मेटकरी यांनी सहकार्य केले. पुढील तपास रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव करीत आहेत. दरम्यान, गेल्याच आठवड्यामध्ये बेकायदेशीर खैरतोड करून वनउपज तस्करी करणार्‍यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. आता खवले मांजर तस्करांना पकडल्याने जंगलतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Powered By Sangraha 9.0