अलिबाग येथील विशेष न्यायालयाचा निर्णय
अलिबाग : अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मामाला अलिबागच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आकाश सिध्दार्थ मोरे (वय १९, रा. पिरडोंगरी, ता. पेण) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
आकाश मोरे हा पीडित ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मानलेला मामा आहे. घटनेच्या दिवशी, पीडित मुलगी पाऊस आल्याने घरातील अंगणात वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्याच वेळेस वीज पुरवठाही खंडीत झाला होता. याचवेळी आकाश मोरे तिथे आला. त्याने मुलीला दरवाजामागे नेऊन तिचा विनयभंग केला आणि लैंगिक अत्याचार केले. ही बाब मुलीने तिच्या आईला घरात येऊन सांगितली.
त्यानंतर आकाश मोरे याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेण पोलीसांनी तपास करून याप्रकरणी अलिबाग विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी काम पाहिले.
सुनावणीदरम्यान एकूण ५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात फिर्यादी, पीडित मुलगी, तपासिक अमंलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सुनावणीअंती आकाश मोरे याला दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.