जेएनपीटीची जहाजे भर समुद्रात रोखली

By Raigad Times    26-Feb-2021
Total Views |
EDIT123_1  H x
 
पुनर्वसनाच्या मागणीसाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक
 
पोलिसांनी केली अटक...सायंकाळी सुटका
 
जेएनपीटी । मागील 32 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे नव्याने पुनर्वसन न केल्याने ग्रामस्थांनी आज (26 फेब्रुवारी) भर समुद्रामध्ये जेएनपीटी बंदरात येणारी जहाजे रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेकडो ग्रामस्थ व कोळीबांधवांनी आपल्या पारंपारिक होड्या जेएनपीटीकडे येणार्‍या जहाजांच्या मार्गात आडव्या घालून मार्ग अडवून धरला होता. त्यामुळे जेएनपीटी आणि पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

Screenshot (4)_1 &nb 
 
पोलिसांनी काही ग्रामस्थांना समुद्र किनार्‍यावरच रोखून ताब्यात घेतले होते, तरीदेखील शेकडो महिला आणि तरूणांनी समुद्रात जाऊन जेएनपीटीचा मार्ग रोखून धरला होता. पोलसांनी जवळपास चारशे ते पाचशे ग्रामस्थांना ताब्यात घेऊन जेएनपीटी टाऊनशिप येथील क्लब हाऊसमध्ये डांबून ठेवले. ग्रामस्थांनी जेएनपीटीच्या समुद्री चॅनलमध्ये आपल्या होड्या आडव्या घालून रस्ता आडवल्याने या आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती. समुद्रात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेएनपीटी वसविण्यासाठी हनुमान कोळीवाडा हे गाव उठविण्यात आले होते.
 
मात्र या गावाचे शासकीय मानकांनुसार पुनर्वसन करण्यात आले नाही. 17.5 हेक्टर जागेवर पुनर्वसन करणे गरजेचे असताना फक्त साडेचार एकर जमिनीवर तेसुध्दा वाळवीच्या जागेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील घरांना वाळवीने पोखरले आहे. शासनाच्या नियमानुसार 17 हेक्टर जागेवर आणि सोयी-सुविधा असलेल्या जागेवर हनुमान कोळीवाडा गावाचे पुन्हा पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत.

hanuman koliwada uran_1&n
 
यासाठी राज्य सरकारपासून केंद्र सरकारपासून उंबरठे झिजवले, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज समुद्रात जेएनपीटी बंदराकडे येणारी जहाजे अडवून कोंडी करण्यात येणार होती. सकाळपासूनच हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेऊन जेएनपीटीची जहाजे अडविण्यासाठी निघाले असताना वाटेतच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
पोलिसांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून जेएनपीटी प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेचाही ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे. काही ग्रामस्थांनी समुद्रात आपल्या होड्या आडव्या टाकून जेएनपीटीकडे येणारी जहाजे अडविण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलक ग्रामस्थांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आणि आंदोलनकर्त्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवून संध्याकाळी त्यांची पोलिसांनी सुटका केली.

IMG_20210226_160705_1&nbs