अवकाळी पाऊस, गारपिटीचा शेतपिकांना फटका; नुकसानीचा अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करा

By Raigad Times    25-Feb-2021
Total Views |
hailstorm_Unseosonal Rain
 
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश
 
मुंबई । जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (24 फेब्रुवारी) दिले आहेत.
 
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ना. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात जानेवारी फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष, मका, डाळिंब, भाजीपाला या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड, सातारा जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश यावेळी वडेट्टीवार यांनी दिले आहेत.