रखडलेला भीमाशंकर मार्ग राष्ट्रीय महामार्ग होणार

By Raigad Times    25-Feb-2021
Total Views |
Karjat Bhimashankar road_
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कार्यवाही सुरु
कर्जत । भीमाशंकर या बारा ज्योतिलिंग ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग ठरू शकेल अशा पनवेल-नेरळ-खेड-मंचर या राज्यमार्गाचे काम रखडले आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प अडगळीत टाकला असून या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा द्यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक कर्जतचे सुनील गोगटे यांनी केली होती. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने या मागणी ला तत्त्वता मान्यता दिली असल्याची माहिती सुनील गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नोव्हेंबर 2020 मध्ये गोगटे यांनी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.
 
कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांनी चार जिल्ह्यातून जाणार्‍या पनवेल-नेरळ-खेड-शिरूर या राज्यमार्ग बाबत पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या रस्ते विकास आराखड्यात पनवेल-नेरे-मालडुंगे-नेरळ-कशेळे-सावळे-तळपेवाडी-वांद्रे-आंबोली-कुडे-घोटवडी- शिरगाव-तळेघर-खेड-शिरूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 103 म्हणून ओळखला जात आहे.पनवेल येथून सुरू होत असलेला हा रस्ता रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत तालुक्यातून जातो. पुढे पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यातून जात असून राजगुरूनगर येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला छेदून पुढे शिरूर येथे शिरूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो.
 
सदर रस्त्यामुळे चार जिल्हे जोडले जात असून 1980 च्या राज्य रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या या राज्यमार्गाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. त्यात बारा जोतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकरच्या बाजूने राज्यमार्ग 103 जा असून बारा जोतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर ला दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येत असतात.
 
मुंबईतून भीमाशंकर येथे जाणारा भाविक आणि पर्यटक हे 268 किलोमीटरचा प्रवास करून जात असतो. मात्र पनवेल-नेरळ-खेड-मंचर या राज्यमार्ग भीमाशंकर येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरू शकतो. जर हा मार्ग झाला तर किमान 63 किलोमीटरचा प्रवास भीमाशंकर येथे जाण्यासाठी कमी होऊ शकतो.
 
त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, दूध यांचे उत्पादन होऊ शकते. ते थेट मुंबईच्या बाजारात आणण्यासाठी राज्यमार्ग 103 जवळचा आणि इंधनाची बचत करणारा मार्ग ठरू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने अडगळीत टाकलेला हा प्रकल्प केंद्र सरकारने आपली हातात घेऊन पूर्ण करावा अशी मागणी सुनील गोगटे यांनी नोव्हेंबर 2020 रोजी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली होती. चार जिल्हे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीच्या जवळ आणण्यासाठी आणि रस्ते वाहतुकीमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हा मार्ग लवकर अस्तित्वात आला पाहिजे अशी मागणी गोगटे यांनी केली आहे.
 
पत्रकार परिषदेत सुनील गोगटे यांच्यासह भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत हे उपस्थित होते. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या माल जवळच्या रस्त्याने मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे. काही भागात हा रस्ता वन जमिनीच्या अडचणी मुळे तर काही भागात हा रस्ता अभयारण्य तसेच इको झोनमुळे रखडला आहे. मात्र गेली 30 वर्षे शासन या बहुपयोगी रस्त्याकडे आणि चार जिल्ह्याच्या संबंधी असलेल्या विकास मार्गाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही हा रस्ता केंद्र सरकार मधील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मागे तगादा लावला आहे. राज्य मार्गाचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्ग मध्ये करून तो दर्जा देऊन पनवेल-नेरळ-खेड-शिरूर असा नवीन राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आणावा ही मागणी 17 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मान्य केली आहे.
 
त्यामुळे आता नजीकच्या काळात अनेक वर्षे रखडलेल्या भीमाशंकर रस्त्याचे काम मार्गी लागेल असा विश्वास सुनील गोगटे यांनी व्यक्त केला. तर राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्यातील फरक प्रत्यक्ष रस्ता अस्तित्वात आल्यानंतर दिसून येईल कारण नव्याने होणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग दर्जाचा असून तो किमान तीन लेन चा असणार आहे अशी माहिती गोगटे यांनी दिली.