'गुणवत्तापूर्ण शिक्षण'साठी रायगड जिल्ह्यातील 3 शाळांची होणार निवड

By Raigad Times    24-Feb-2021
Total Views |
Education Campaign_1 
 
जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन करणार अमंलबजावणी
 
अलिबाग : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील 3 शाळांची 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियाना'त निवड करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा धोरणास पूरक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व बालभारतीच्या मदतीने राज्यात जिल्हा परिषदेच्या “मिशन 100 आदर्श शाळा” हा उपक्रम राबविला जाणार आहे.
 
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील शाळांमध्ये या अभियानाची अमंलबजावणी जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम सामाजिक परिवर्तनचे जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये यांनी दिली आहे.
 
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवात्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा, आरोग्य पोषण, आनंदादायी शिक्षण आदी उद्दिष्टे राहणार आहेत. या शाळांच्या निवडीबाबत ही योजना महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानात समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी राहणार आहे. शाळेची पटसंख्या 100 च्या पुढे असणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील शाळांसाठी किमान 60 पटसंख्या असणे हा निकष ठेवण्यात आलेला आहे.
 
शाळेची इमारत निर्लेखन झालेली नसावी, शाळेला स्वत:ची जागा असावी, गावामध्ये उत्स्फूर्त सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी बिगर आदिवासी भागात येणाऱ्या शाळेतील गावांनी 10 टक्के लोकसहभाग ( 5 टक्के लोकवाटा व 5 टक्के श्रमदान ) देणे अपेक्षित आहे. ग्राम सामाजिक परिवर्तनमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचा विनीयोग पादर्शक पध्दतीने होण्यासाठी लोकसहभाग आधारित उपक्रम घेणे अपेक्षित आहे.
 
रायगड जिल्ह्यातून ज्या 3 शाळांची या योजनेत निवड होईल, त्या शाळांमध्ये शासनाच्या कृती संगमातूनसुध्दा भौतिक सुविधांवर काम होणे अपेक्षित आहे. गावास विविध योजनांमधून मिळालेले पुरस्कार, शाळेतील शिक्षकांना पुरस्कार, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमात सहभाग असलेल्या शाळेची प्राधान्याने या उपक्रमात निवड करणे अपेक्षित आहे. या शाळांना भेटी देऊन शाळा विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये यांनी दिली आहे.