पुणे पोलिसांच्या नाकी नऊ आणणार्‍या चोराच्या रायगड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

02 Feb 2021 20:11:35
Raigad Police _1 &nb
 
  • पुण्यात दाखल आहेत 37 चोरी, घरफोडीचे गुन्हे
  • खोपोलीतील दोन गुन्हेही आले उघडकीस
अलिबाग । चोर्‍या, घरफोड्या करुन पोलिसांपुढे आव्हान उभे करणार्‍या दोन चोरांना खोपोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. यापैकी विकास कांबळे याच्यावर पुण्यात चोरी, घरफोडी, वाहनचोरीचे 37 गुन्हे दाखल असून, 11 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये तो ‘वाँटेड’ आहे. या चोरांकडून खोपोलीतील दोन गुन्हे उघडकीस आले असून, दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
 
खोपोली शहरात रात्रीच्या वेळी दुकान फोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. याची गांभीर्याने दखल घेत, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व गुन्हे प्रकटीकरण पथकाला रात्री गस्त करुन चोरांना अटक करण्याबाबत सूचित केले. त्यानुसार खोपोली बाजारपेठ व महत्वाच्या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवून चोरांचा शोध सुरु करण्यात आला.
 
27 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शिळफाटा येथे अजय वाईन्स या शॉपचे शटर उपकून चोरी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रविण भालेराव यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने सापळा रचून गणेश सचिन जमदाडे (वय 19, रा.बौध्द नगर, एम.आय.डी.सी पाण्याच्या टाकीजवळ पिंपरी जि.पुणे) या संशयिताला मोटारसायकलसह ताब्यात घेेतले.
 
चौकशीत त्याने खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेला गु.रजि.नं. 19/2021 हा घरफोडी, चोरीचा गुन्हा त्याने व त्याच्या साथीदाराने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली व त्याचा फरार साथीदार विकास दिलीप कांबळे (वय 27, रा.बौध्दनगर एम.आय.डी.सी. पाण्याच्या टाकीजवळ पिंपरी जि.पुणे) याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.
 
त्यांच्याकडून अ‍ॅक्सेस मोटारसायकल क्र. एम.एच.14/इके5873 ही मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच चिंचवड पोलीस ठाणे हद्दीतून चोरण्यात आलेली बजाज पल्सर मोटारसायकल क्र.एम.एच.14 जे.एफ 7382 ही गाडीही हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय खोपोली पोलीस ठाण्यात दाखल गु.रजि.नं.20/2021 या चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली त्यांनी दिली. विकास कांबळे हा पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात 11 पोलीस ठाण्यांतील विविध गुन्ह्यांतील ‘वाँटेड’ आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत.
 
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या सुचनेप्रमाणे आणि खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील, दिनेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रविण भालेराव, प्रदिप खरात, सतिश बांगर, कादर तांबोळी तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार अक्षय पाटील, तुषार घरत यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Powered By Sangraha 9.0