रोहा-मुरुड प्रस्तावित फार्मा पार्क खासदार सुनील तटकरे यांची दुटप्पी भूमिका

By Raigad Times    18-Feb-2021
Total Views |
Mahesh Mohite_1 &nbs
 
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा आरोप
 
अलिबाग । कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे खासदार सुनील तटकरे हे मुरुड, रोहा येथे येणार्‍या फार्मा पार्क प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांनी केला आहे. शेतकर्‍यांना फार्मा पार्क प्रकल्प नकोअसताना का लादला जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
फार्मा पार्क शेतकर्‍यांचा विरोध आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच स्थानिक आमदारांना निवेदनामार्फत विरोध दर्शविला आहे. स्थानिकांचा नको असेल तर प्रकल्प होणार नाही, अशी ग्वाही खासदारांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कसा झाला पाहीजे याचे सविस्तर पत्रच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिल्याचा आरोप अ‍ॅड. मोहिते यांनी केला.
 
गुरुवारी या प्रकल्पाबाबत जनसुनावणी होणार आहेत. बुधवारी (दि.17) आदल्या दिवशी अ‍ॅड. मोहिते यांनी अलिबाग तुषार विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी मोठ्या प्रमणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी खा. सुनील तटकरे यांनी याच परिसरात प्रकल्प व्हावा, यासाठी केंद्रीय रसायनमंत्र्यांना लिहिलेले पत्र अ‍ॅड. मोहिते यांनी पत्रकारांसमोर उघड केले. खा.तटकरे यांनी केंद्रीय रसायन मंत्री गौडा यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी तटकरे यांनी रोहा, मुरुड परिसरात फार्मा पार्क प्रकल्प व्हावा, यासाठी गौडा यांना 3 फेब्रुवारी 2021 ला निवेदन दिले. यामध्ये त्यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.
 
रोहा, मुरुड येथे 19 गावातील शेतकर्‍यांची सुपीक जमीन, घरे या फार्मा प्रकल्पात जात आहे. फार्मा पार्क हा रासायनिक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे हरकती शेतकर्‍यांनी नोंदविल्या आहेत. असे असताना शासन आणि प्रशासन शेतकर्‍यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रकल्प थोपवू पाहत आहे. यामागे कमी भावाने मोठ्या प्रमाणात घेतलेल्या जमिनी शासनाला देवून स्वत...चे उखळ पांढरे करायचे षङयंत्र आहे का? याची चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. मोहिते यांनी म्हटले आहे.