
आजपर्यंत 800 हुन अधिक नागरिकांचा अपघाताने मृत्यू
उरण । उरण पनवेल तालुक्याला जोडले गेलेल्या NH 4B हा रस्ता जेएनपीटी ते पळस्पे फाटा जवळपास 25 किलोमीटर आहे. उरण पनवेलची जनता या रस्त्याने नेहमी ये-जा करीत असते. प्रवासासाठी या रस्त्याचा उरण व पनवेल मधील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात करतात हा रस्ता आता चारपदरी झाला आहे. त्याला सर्व्हिस रोड सुद्धा आहे. ते जनतेच्या सुरक्षेसाठी नसून कंटेनर, ट्रेलर च्या पार्किंग साठी आहे. या रस्त्यामध्ये हायवे आणि सर्विस रोड या दोन्ही ठिकाणी कंटेनर, ट्रेलर ट्रक पार्किंग केले जातात. रात्रीच्या वेळेस दोन्ही ठिकाणी भर रस्त्यात पार्किंग केले जातात. प्रवाशी नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोकळा रस्ता मिळत नाही.या अवैध पार्किंग मुळे सर्वसामान्यांचे प्रवास धोकादायक झाले असून या अवैध पार्किंगला पोलिसांचे वरदहस्त असून हे सर्व अवैध पार्किंग पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत यांनी केला आहे.
उरण पनवेल रोड तसेच NH 4B हायवेवर चुकीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कंटेनर, ट्रक, ट्रेलर मुळे आजपर्यंत अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांचे या वाहनांना धडक लागून मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींचा यात समावेश आहे.या तरुण युवा वर्गावर कुटुंब सांभाळण्याची प्रमुख जबाबदारी असते. घरातील कर्ता व्यक्ति गेल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. घरातील एक प्रमुख व्यक्ति मृत्युमुखी पडल्याने आख्खे कुटुंब रस्त्यावर येते. त्यांना सहानुभूती तर सोडाच साधे नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. उलट अपघात झालेल्या व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ति व त्यांच्या नातेवाईंकावर पोलीस प्रशासनातर्फे गुन्हे नोंदविले जातात. व अवैध पार्किंग करणार्या वाहन चालक व मालकांवर कोणतेही कारवाई न करता त्यांना मोकळे सोडले जाते असे प्रकार उरण-पनवेल तालुक्यात नेहमी पाहावयास मिळतात. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाच्या पाठीशी कोणीही ठामपणे उभे राहत नसल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी घटना कोणीही गांम्भीर्याने घेत नाहीत. कोणाला याचे सोयसुतक नसते.

काही दिवसापूर्वी एक भयानक अपघात झाला त्यात चारचाकी गाडीने चाललेला एक 25 वर्षीय युवक रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोराने धडकला त्याच्या मेंदूला मार लागला. आज तो हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत असून अजूनही तो शुद्धीवर आला नाही. पण पोलिसांनी त्या कंटेनर मालकावर उधार होऊन त्याला काही न करता 25 वर्षीय तरुण जो आजही शुद्धीवर आला नाही त्याच्यावर आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला. असे अनेक निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणार्या घटना या परिसरात घडत आहेत. अवैध पार्किंग करणारे चालक, मालकांवर कायद्याचे कोणतेही वचक नसल्याने उरण पनवेल परिसरात दिवसेंदिवस अपघातात वाढ होताना व अनेक नागरिक मृत्युमुखी पडताना दिसत आहेत.यामुळे अवैध पार्किंग करणारे वाहन चालक, मालक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरण पनवेल मधील जनतेसह काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व असलेले उरण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.