पनवेल मनपा क्षेत्रातील पथविक्रेत्यांच्या सर्व्हेक्षणास पुन्हा सुरुवात

By Raigad Times    11-Feb-2021
Total Views |
hawkers _1  H x
 
कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
 
पनवेल । दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान पालिकेच्यावतीने राबविले जात आहे. या अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागात गतवर्षी पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण चालू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून हे सर्व्हेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
 
मागील वर्षी पालिकेच्यावतीने 6 हजार 502 पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. आता उर्वरित पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. सर्व्हेक्षणानंतर अंतिम यादी शहर फेरीवाला समितीच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम यादीतील पथविक्रेत्यांना पालिकेच्यावतीने ‘अधिकृत पथविक्रेते’ म्हणून ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 
सर्व्हेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांनी आठ दिवसांच्या आत प्रभाग समिती ‘ड’ मध्ये आपली कागदपत्रे जमा करावी, असे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 2 हजार 500 पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. उर्वरित पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे जमा करावी, असे पनवेल आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
 
पंतप्रधान आत्मनिर्भर निधीचा लाभ घ्या; पथविक्रेत्यांना आवाहन
 
पंतप्रधान आत्मनिर्भर निधीतून पथविक्रेत्यांना रूपये दहा हजार कर्ज दिले जाते. पालिकेला सात हजार पथविक्रेत्यांचे अर्ज भरण्याचे लक्ष देण्यात आले आहे. पथविक्रेते अर्थात फेरीवाला ठेलेवाला, रेहरीवाला ठेलीफडवाला ज्यांच्याव्दारे भाज्या, फळे तयार खाद्यपदार्थ चहा, भजी, पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागिरांद्वारे उत्पादीत वस्तू, पुस्तके, स्टेशनरी अशा वस्तूंचा पुरवठा करणारे विक्रेते.
 
याशिवाय केशकर्तन दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने यांचाही यात समावेश होतो. या योजनेंतर्गत आतापर्यंत 4 हजार 377 अर्ज भरले गेले आहेत. या योजनेचा लाभ पथविक्रेत्यांनी करून घ्यावा, यासाठी आपल्या प्रभागातील महापालिका कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.