...विहिरीत उडी मारल्यानंतर ‘तो’ चोवीस तास अडकून पडला होता!

By Raigad Times    11-Feb-2021
Total Views |
Raigad_Police_1 &nbs 
  • पायरीचा आधार घेत काढली रात्र
  • सोनसडे ग्रामस्थ आणि तळा पोलिसांच्या मदतीने तरुणाला जीवदान
विराज टिळक/तळा । तळा तालुक्यातील सोनसडे गावातील एका तरुणाने विहिरीत उडी मारली, मात्र त्याला बाहेर पडता येईना. त्यानंतर तो 24 तास त्याच विहिरीमध्येच अडकून पडला. एका पायरीचा आधार घेत, त्याने रात्र काढली. सकाळी त्याच्या शोधात गावकरी या विहिरीपर्यंत आले, त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात यश आले.
 
सोनसडे गावापासून साधारणतः सातशे मीटर अंतरावर शेतात ही विहीर असून, मनोज महादेव माळी (वय 35 वर्षे) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. मनोजने बुधवारी (10 फेब्रुवारी) या विहिरीत उडी मारली. मात्र उडी मारल्यानंतर त्याला विहिरीतून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तो अडकून पडला. विहिरीतील एका पायरीचा आधार घेत, त्याने रात्र काढली. चोवीस तास उलटले होते. दुसर्‍या दिवशी गावकरी त्याचा शोध घेत घेत या विहिरीजवळ पोहोचले. तेव्हा मनोज त्यांना विहिरीतील पायरीवर बसलेला आढळून आला.

Raigad_Police_1 &nbs 
 
गावकर्‍यांनी तात्काळ तळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर विहिरीत अडकून पडल्याने मनोज प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता. पोलीस निरीक्षक गेंगजे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक मनोहर पाटील, घरत, पोलीस शिपाई जगताप, भुसे आणि ग्रामस्थांनी त्याला समजावून अथक प्रयत्नांनी विहिरीतून बाहेर काढले. हा तरुण गतिमंद असल्याची माहिती तळा पोलिसांनी दिली. तसेच तो 24 तास विहिरीत अडकून पडला असल्याचेही सांगण्यात आले.