म्हसळा नगरपंचायत निवडणूक; ४० उमेदवारी अर्ज वैध

08 Dec 2021 16:24:59
mhasala nagar panchayt_1&
 
सुशिल यादव
म्हसळा | म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवकपदासाठी ४८ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी नामनिर्देशन छाननी आणि हरकतींच्या सूनावणीअंती निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी नगरसेवक पदासाठी असणारे ४० अर्ज वैध ठरविले. प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीने आपले खाते उघडले असून सरोज म्हशीलकर या बिनविरोध निवडूण आल्या आहेत.
अर्थात त्याची औपचारीक घोषणा होणे बाकी आहे.
 
म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-कॉंग्रेस युती यांच्यात खरी लढत होणार आहे. तर भाजप आणि शेकापने सुद्धा तगडे आव्हान दिले आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडणार्‍या म्हसळा नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण ४८ अर्जापैकी सर्व ४० अर्ज वैध ठरले. अर्ज छाननीसाठी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. छाननीदरम्यान सर्व इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थकांनी म्हसळा तहसील कार्यालयात गर्दी केली होती.
 
प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज म्हशीलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने या प्रभागाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण असणार्‍या चार प्रभागातील आठ अर्जाची छाननी करण्यात आली नाही.
 
निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी अर्जांची छाननी करून उमेदवारांच्या हरकतींवर निर्णय दिला. मुख्याधिकारी मनोज उकिर्डे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या छाननी प्रक्रियेत सर्व पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी सर्वानुमते ही निवडणूक शांतपणे पार पडावी म्हणून उमेदवारांच्या अर्जावर कोणीही हरकत न घेण्याचे ठरले.यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पार पडली.
Powered By Sangraha 9.0