म्हसळा नगरपंचायतीसाठी ६0 उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी, शिवसेनाकॉंग्रेस युती, भाजप, शेकापतर्फे अर्ज दाखल

By Raigad Times    08-Dec-2021
Total Views |
mhasala election_1 
 
 म्हसळा | म्हसळा नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (७ डिसेंबर) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी १७, कॉंग्रेसचे ९, शिवसेना ७ भाजप ७, शेकाप आणि अपक्ष १ यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रक्रियेत विलंब होत असल्याने दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेडगे यांनी सांगितले.
 

mhasala election_1  
 
म्हसळानगर पंचायतीमध्ये शिवसेना-कॉंग्रेस पक्षाची युती झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या समर्थकांचे सहकार्य घेत स्वबळावर निवडणूक लढवित आहे. भाजप आणि शेकाप म्हसळा नगरपंचायतीमध्ये काही मोजक्याच जागेवर नशीब आजमावत आहे. बहुतांश प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सरळ लढत कॉंग्रेस आणि सेना कॉंग्रेस युतीशी होणार असल्याचे दिसत आहे.
 
प्रभाग क्रमांक ४ मध्ये जागा अनुसूचित जाती जमाती महिलांकरिता आरक्षित असून या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज मंगेश म्हशिलकर यांचा एकमेव अर्ज सादर केला असल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. प्रभाग १ ते ४ अर्ज वगळता अन्य सर्व प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात शिवसेना- कॉंग्रेस युतीमध्ये सरळ लढत होणार आहे.
 
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्त्यांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी लगबग सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने तसेच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धती असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जाते.
 
म्हसळा नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.