‘ओमीक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन प्रशासन सतर्क

30 Dec 2021 16:01:32
shrivardan 1
 
दिवेआगर, बोर्लीपंचतन येथे प्रशासनाची दंडात्मक कारवाई
 
बोर्लीपंचतन (अभय पाटील) | श्रीवर्धन तालुक्यामध्ये पर्यटनस्थळावर नवीन वर्षांच्या स्वागताला पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यात ओमीक्रॉन संसर्गाने डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याने श्रीवर्धनमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांना याबाबत समज देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांनी केले आहे.

shrivardan 2
 
‘ओमीक्रॉन’चा धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. श्रीवर्धन हे पर्यटनस्थळ असल्याने हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर या ठिकाणी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताला लाखो पर्यटक दाखल होणार आहेत. यासाठी आता प्रशासनापुढे गर्दी रोखणे, नियमांचे पालन व्हावे, यासाठी श्रीवर्धन प्रशासनही सज्ज झाला आहे. यातच आज दिवेआगर समुद्र किनारी व मंदिर परिसरामध्ये विनामास्क फिरणार्‍या तसेच ५० टक्के वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
 
 
बोर्लीपंचतन बाजारपेठेमध्ये कारवाई करण्यात आली. यामध्ये श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, दिवेआगर सरपंच उदय बापट, ग्रामसेवक शंकर मयेकर, तलाठी निलेश पवार यांनी संयुक्तपणे कारवाई केली. तर तहसीलदार सचिन गोसावी यांनी प्रबोधनही केले, गर्दीच्या ठिकाणी न जाता मास्कचा वापर करा, हात वारंवार स्वच्छ ठेवा, आपला परीसर स्वच्छ ठेवा, सर्वजनिक ठिकाणी थुंकू नका, सॅनिटायझरचा वापर करा, प्रशासनाने दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असे प्रबोधन तहसीलदार यांनी केले.
 
तालुक्यामध्ये प्रत्येकाने आता ओमीक्रॉन व कोरोनाबाबतची सतर्कता बाळगावी. आपले व इतरांचेही आरोग्य जपावे, ज्यांनी लस घेतली नसेल तर लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करावे, प्रशासनाच्यावतीने नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर दंडात्मक कारवाई चालूच राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0