जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची गोळ्या झाडून हत्या; खुनी भाऊ अटकेत

पेण तालुक्यातील खळबळजनक घटना

By Raigad Times    27-Dec-2021
Total Views |
Murder _1 
 
पेण (देवा पेरवी) । जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची घराच्या अंगणातच गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथे घडली. याप्रकरणी खुनी भावाला दादर सागर पोलिसांनी अटक केली आहे.
 
रविवारी (26 डिसेंबर) सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. राम हरिभाऊ पाटील (वय 67, रा. पेण हनुमान पाडा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राम पाटील आणि खुनी पांडुरंग हरिभाऊ पाटील (रा. पेण) हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
या दोघांमध्ये जमिनीवरुन वाद सुरु होते. गुरांच्या वाड्यावरुन सुरु झालेला हा वाद रविवारी टोकाला पोहोचला. संतापाच्या भरात पांडुरंग पाटील याने रविवारी सायंकाळी राम पाटील यांचे घर गाठले आणि त्यांच्या घराच्या अंगणातच त्याच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या.

Murder _1
 
एक गोळी राम पाटील यांच्या उजव्या खांद्याला लागली. तर दुसरी डाव्या बरगडीच्या खाली लागली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या राम पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने हनुमानपाडा गावात खळबळ उडाली आहे.
 
जागेसाठी सख्ख्या भावाचा खून करणार्‍या पांडुरंग पाटील याच्याविरोधात दादर सागरी पोलीस ठाण्यात हत्येसह आर्म्स अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. आज (27 डिसेंबर) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
 
दरम्यान, पांडुरंग पाटील हा मिलिटरीमध्ये होता. सेवानिवृत्तीनंतर तो पेणमधील गावी रहायला होता. त्याच्याकडे असलेल्या डबल बारच्या बंदुकीतूनच त्याने गोळ्या झाडून ही हत्या केल्याची माहिती मिळते आहे. हत्येनंतर पांडुरंग घटनास्थळावरुन फरार झाला होता. दादर सागर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या पथकाने त्याला काही तासांतच पनवेल येथून अटक केली.