श्रीवर्धन : वडवली येथील शिवसैनिक पक्षश्रेष्ठींवर नाराज

7 वर्षांमध्ये कोणताही निधी न दिल्याने पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी

By Raigad Times    27-Dec-2021
Total Views |
Shiv Sena_1
 
 
बोर्लीपंचतन (अभय पाटील) । श्रीवर्धन तालुक्यातील वडवली हे गाव रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे. खा.तटकरे यांच्या प्रयत्नातून सध्या वडवलीमध्ये विकासकामे सुरु आहेत; परंतु शिवसेना पक्षश्रेष्ठींकडून कोणताही विकासनिधी दिला जात नसल्याने, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असूनही मागील 7 वर्षांमध्ये विकासकामासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊ नये किंबहुना सुमारे 5 ते 6 हजार लोकसंख्या असलेले वडवली गाव फक्त निवडणुकीपुरते विचारात घेतले जाणे, हे विचार करण्यासारखे आहे असे मत येथील शिवसेना पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
 
पक्षाला संजीवनी देण्याचे काम तळागाळातील शिवसैनिक देत असतात; परंतु तालुका, जिल्हा स्तरावरील शिवसेना लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत? हाच प्रश्न स्थानिक पदाधिकारी यांना पडला आहे. यामध्ये शाखा प्रमुख हरिश्चंद्र चाळके, शिवसेनेचे युवा सेना तालुका उपाधिकारी श्रीकर किर, संतोष बिराडी, प्रकाश भायदे व जयवंत कांबळे यांनी पत्रकारांकडे खंत व्यक्त केली.
 
--------------------------------------
आम्ही शिवसेनेचे प्रत्येक कार्य निष्ठेने करीत आहोत. आतापर्यंत प्रत्येक शिवसैनिक व स्थानिक पदाधिकारी यांच्या सहकार्यातून आम्ही पक्षाने दिलेली कामगिरी पार पाडत असतानाही मागील काही वर्षांमध्ये वडवली गावासाठी पक्षामार्फत विकासनिधी मिळावा. यासाठी तोंडी व लेखी मागणी करुनही विकासनिधी न मिळणे याचे दुःख शिवसैनिकांना आहे. पक्षनेतृत्वाने व पदाधिकार्‍यांनी याकडे लक्ष वेधावे, अशी आमची मागणी आहे.
- हरिश्चंद्र चाळके,
शाखाप्रमुख, वडवली शिवसेना