रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी मिळाले पाणी!

फुटलेल्या जलवाहिन्यांची तात्पुरती दुरुस्ती

By Raigad Times    22-Dec-2021
Total Views |
Roha water shortage_1 
 
पाणीपुरवठा मध्यम दाबाने सुरु
 
रोहा | गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणार्‍या रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी अखेर पाणी मिळाले. नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात यंत्रणेला यश आले आहे. मात्र नवीन आणि जुनी जलवाहिनीचा ताळमेळ होत नाही. परिणामी, या जलवाहिनीला पाण्याच्या दाबामुळे भगदाड पडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा धीम्या गतीने सुरु करण्यात आला आहे.
 
जलवाहिनीच्या फुटलेल्या भागांची गेले पाच दिवस सातत्याने दुरुस्ती केल्यानंतर सहाव्या दिवशी मंगळवारी (२१ डिसेंबर) सकाळी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा सुरु झाला. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणार्‍या आणि आंघोळीसाठी धडपडणार्‍या रोहेकरांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला.
 
रोहा नगरपालिकेने सुमारे १२ कोटी रुपये खर्च करुन डोलवहाळ ते रोहे असे जलवाहिनीचे काम केले. गेल्या बुधवारी रोहा कोलाड रोडवरील क्लॅरियंट कंपनीजवळ या जलवाहिनीला पुन्हा एकदा भगदाड पडले. त्यामुळे रोहा नगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले.

Roha water shortage_1
 
१२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाचा दर्जा अत्यंत तकलादू असल्याने तसेच नवीन आणि जुन्या पाईपलाईनचा योग्य ताळमेळ होत नसल्याने दुरुस्तीनंतरही या जलवाहिनीला सातत्याने कुठे ना कुठे भगदाड पडत होते. त्यामुळे पाच दिवस रोहेकरांना पाण्यावाचून काढावे लागले.
 
सोमवारी रात्री उशिरा दुरुस्तीचे काम कसेबसे पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी सकाळी टप्प्याटप्प्याने शहरात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गेले पाच दिवस टँकरच्या पाण्यावर दिवस ढकलणार्‍या रोहेकरांची या पाणी टंचाईतून सुटका झाली आहे.
 
ठेकेदाराची चौकशी करा; सल्लागार कमिटीला काळ्या यादीत टाका
 
एकीकडे रोहेकरांची पाण्यावाचून अशी बिकट अवस्था असताना त्यांच्या मदतीला शिवसेना धावून गेली. गेले पाच दिवस रोहे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी घरोघरी पाणी पोहोचवले. शिवसेनेने गेले पाच दिवस व रात्री टँकरने मोफत पाणीपुरवठा केल्याने नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
 
दरम्यान, या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या दर्जाची चौकशी करावी. तसेच ठेकेदार, थर्ड पार्टी ऑडिट करणारी संस्था आणि या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.