पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

काही अटींसह शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

By Raigad Times    16-Dec-2021
Total Views |
Bullock Cart Race _1  
 
नवी दिल्ली । महाराष्ट्र राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा पुन्हा उडणार आहे. काही अटींसह शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीत कोणती काळजी घ्यावी आणि जबाबदारी कोणाची असेल, या अटींसह बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
इतर दोन राज्यांत बैलगाडा शर्यत सुरू आहे, मग महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. घटनापीठाने इतर राज्यांना परवानगी दिली; मग महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.
 
गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणार्‍या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्यातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती.
 
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयात बैल धावू शकत नाही, यांवर युक्तीवाद झाला. बैलाला धावण्याची गरज असते. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे खिलारी बैल बसून आहेत. त्यामुळे खिलारी जातीच्या बैलाचे नुकसान होत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
 
दरम्यान, नुकत्याच 2019 मध्ये झालेल्या पशुगणनेत शर्यत बंदीमुळे राज्यातील खिलार देशी गाईची संख्या 45 टक्के कमी झाल्याचे दिसून आले आहे.