अपघात! लग्न समारंभाहून परतणार्‍या बसची सिमेंट बल्कर टँकरला धडक; 3 कामगारांचा मृत्यू

12 Dec 2021 20:08:05
accident-mumbai-pune expr
 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील घटना
 
खोपोली (योगेश वाघमारे) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लग्न समारंभ आटोपून लोणावळ्याहून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेल्या बसने सिमेंट बल्कर टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स्प्रेस वेवर काम करणार्‍या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. एक्स्प्रेस हायवेवरील किमी 36 जवळ काम सुरु असलेल्या ठिकाणी ही दुर्घटना घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस 11 डिसेंबर रोजी लोणावळ्याहून लग्नसमारंभ आटोपून रात्री एक्स्प्रेस हायवे मार्गे मुंबईच्या दिशेने निघाली होती. एक्सप्रेस वेवर बोरघाटात जादा लेनसाठी काम सुरु असून याठिकाणी दिवस व रात्र पाळीत यंत्रणेसह कामगार कार्यरत आहेत. रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास किमी 36 जवळ भरधाव वेगात असलेल्या या बसने या ठिकाणी उभ्या असलेल्या सिमेंट मिक्सर बल्करला जोरदार धडक दिली.

accident-mumbai-pune expr
 
या अपघातात याठिकाणी काम करणार्‍या नितेश दशरथ कांबळे (रा.शांतीनगर, खोपोली), बबलू आणि जगदीश राज या कामगारांचा मृत्यू झाला. तर बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघातात आणखी दोन वाहनांना धडक बसून एकूण चार वाहनांचे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची रुग्णवाहिका व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, प्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्यूंजय देवदूत यांनी मदतकार्य केले.

accident-mumbai-pune expr 
Powered By Sangraha 9.0