घटनास्थळी सापडला शीर नसलेला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह
माथेरान । माथेरानमधील इंदिरा नगर परिसरात एका महिला पर्यटकाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली. शीर नसलेले निर्वस्त्र अवस्थेतील धड घटनास्थळी आढळून आले असून, महिलेचे मुंडके हत्या करणार्याने कापून नेले असल्याने परिसर हादरुन गेला आहे.
माथेरानमधील इंदिरानगर परिसरात अनेक लॉजिंग व्यवसाय करीत असतात. अशाच एका ठिकाणी ही घटना घडली असून शनिवारी (11 डिसेंबर) ह्या ठिकाणी एक जोडपे राहण्यासाठी आले होते. नेहमीप्रमाणे लॉजिंग मालकाने त्यांची नावे रजिस्टरमध्ये नोंदवून त्यांना खोली भाड्याने दिली होती. आज (12 डिसेंबर) सकाळी लॉजमालक या पर्यटकांना पाहण्यासाठी गेला असता भाड्याने दिलेल्या खोलीमध्ये महिला पर्यटकाचा मृतदेह आढळून आला. शीर नसलेले निर्वस्त्र अवस्थेतील धड कॉट खाली आढळून आले.
या महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन, कोणताही पुरावा मागे राहणार नाही, याची खबरदारी खुनीने घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. खुनी धडापासून शीर वेगळे करुन सदर धड निर्वस्त्र अवस्थेत तिथेच सोडून गेला आहे. तर महिलेचे शीर व कपडे सोबत घेऊन जाताना सदर खोलीतील रक्तही पुसले असल्याचे दिसून येत होते. ही घटना समोर आल्यानंतर दोघांचीही ओळखपत्रे तपासण्यात आली, तेव्हा रुम घेताना दिलेली माहिती खोटी असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.पी. लगारे आणि कर्जत ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता पत्की यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, खुनीने मृत महिलेचे शीर सोबत नेल्याने मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे लॉजच्या नोंदवहीत महिलेचे नाव रुबिना बेन व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव अमजद खान अशी खोटी माहिती भरली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. या घटनेमुळे नेहमी शांत असणारे माथेरान पुरते हादरले आहे.