महाराष्ट्राची वाटचाल सर्वांगीण विकासाकडे होवो...

डॉ.नीलम गोर्‍हे यांची महडच्या वरदविनायकाचरणी प्रार्थना

By Raigad Times    12-Dec-2021
Total Views |
dr.neelam gorhe_Varadvina
 
  • पालीच्या बल्लाळेश्वर तीर्थक्षेत्रासही दिली भेट
  • खोपोली-पाली रस्त्याच्या कामाबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी
अलिबाग । तमाम भाविकांची श्रद्धा वाढीस लागो आणि महाराष्ट्राची वाटचाल सर्वांगीण विकासाकडे होवो, अशी प्रार्थना श्रीगणराया चरणी आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी आज (12 डिसेंबर) जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महड येथे केले. यावेळी त्यांनी खोपोली-पाली मार्गाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

dr.neelam gorhe_Varadvina 
अष्टविनायक क्षेत्रापैकी महड येथील सुप्रसिद्ध श्री गणेश मंदिरास डॉ.नीलम गोर्‍हे यांनी आज भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रेखा ठाकरे, संतोष विचारे, गणपत पाटील, रेश्मा आंग्रे, अनिता पाटील देशमुख-दिसले, उपसभापती कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सचिन शिकलकर, स्वीय सहाय्यक योगेश जाधव व किरण शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे पुढे म्हणाल्या की, महड देवस्थान विकास कामासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. महड फाटा ते महड देवस्थान अशा मार्गावर पथदिवे हायमास्कसाठी रुपये पाच लाखांचा निधीही महड देवस्थान समितीला देण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली असून महाविकास आघाडीचे शासन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

dr.neelam gorhe_Varadvina
 
देवस्थान अष्टविनायक आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असून अष्टविनायक देवस्थानच्या विकास आराखड्यांतर्गत लवकरच रस्त्यांची सुधारणा होण्याच्या दृष्टीनेही आवश्यक कार्यवाही केली जाईल. रस्त्यांची सुधारणा होण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाणार आहे. तर देवस्थानाला भेट देणार्‍या भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात, असे सांगून डॉ.गोर्‍हे यांनी खोपोली-पाली मार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

dr.neelam gorhe_Varadvina
 
यासंदर्भात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत चौकशी करून याप्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन देवस्थान विकास कामांसाठी आवश्यक निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान डॉ. नीलम गोर्‍हे यांनी स्वतःच्या आमदार मानधनातून वैयक्तिक 11 हजार रुपयांची देणगी देवस्थान समितीचे केदार जोशी, मोहिनी वैद्य यांच्याकडे सुपूर्द केली.
------------------------------------------
 
पाली येथील बल्लाळेश्वर अष्टविनायक तीर्थक्षेत्रासही दिली भेट
महडच्या वरदविनायकासह, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी आज सुधागड पाली येथील सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर अष्टविनायक तीर्थक्षेत्रासही भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रवींद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य रमेश सुतार, तहसिलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी विजय यादव, उपसरपंच विनय मराठे, देवस्थान ट्रस्टी उपेंद्र कानडे, सचिन साठे उपस्थित होते.

dr.neelam gorhe_Varadvina
 
उपसभापती डॉ.गोर्‍हे यांनी पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या विकास कामांसंबंधीचा सविस्तर आढावा घेतला व लवकरच ही विकास कामे मार्गी लावण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन कामे पूर्ण केली जातील, असे सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसारची कामे, बायपास रस्ता इत्यादी प्रलंबित विषयांबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगितले.