पनवेलजवळ भरदिवसा सोने व्यापार्‍याला लुटणारी टोळी अटकेत

10 Dec 2021 20:28:39
panvel gunhe shakha_1&nbs
 
राम बोरीले / पनवेल । कळंबोली येथे भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणार्‍या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून त्याच्याजवळील 19 लाख रुपये या चोरट्यांनी लुटले होते. अटक केलेल्या आरोपींकडून 22 लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
यावर अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देली होती. तसेच याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. अनिकेत जोमा म्हात्रे, कार्तिक सुशिल सिन्हा, किरण विजय पवार, भिमा रामराव पवार, मनोज गुरम्या राठोड, तसेच लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्याकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली 3 घातक शस्त्रे, फिर्यादी यांची रक्कम ठेवलेली बॅग, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व लुटलेली संपूर्ण रक्कम अशी एकूण 22 लाख 54 हजार एवढ्या रकमेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
 
बीडमधील अंबेजोगाई येथील सोन्याचे व्यापारी शुक्रवारी रात्री सोने खरेदी करण्यासाठी अंबेजोगाई येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसने मुंबई येथे येत असत. लुटण्यात आलेले व्यापारी आणि अटक आरोपी अनिकेत म्हात्रे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सदर व्यापारी कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर सकाळी सातच्या सुमारास उतरुन अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तिकडे फ्रेश होण्यासाठी जात असत. त्यांनतर ते सोने खरेदी करून पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बसने मूळगावी परत जात असत.
 
ही संपूर्ण माहिती अटक आरोपी अनिकेत याने त्याच्या इतर साथीदारांना दिली. यानंतर या टोळीने या व्यापार्‍याला लुटण्याचा कट रचला. मात्र पनवेल गुन्हे शाखाने या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखाचे सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या नेतृत्वाखाली पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांच्या पथकाने विशेष मोहिम फतेह केली.
Powered By Sangraha 9.0