सुधागड : पालीत माकडांचा उच्छाद; नागरिक हैराण

कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी

By Raigad Times    07-Nov-2021
Total Views |
nuisance_1  H x
 
पाली/बेणसे । महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक क्षेत्र असलेल्या व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीमध्ये माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून, या माकडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी विद्येश आचार्य यांनी वन विभाग व तालुका प्रशासनाकडे केली आहे.
 
पालीमधील राम आळी, बाजारपेठ, देऊळवाडा, मधली आळी, खडकाळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगरआळी, उंबरवाडी, सावंतआळी अशा सर्वच गजबजलेल्या भागात माकडे रोज धुमाकूळ घालत आहेत. माकडे छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडतात. ड्रेनेजचे पाईप, विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले सामान, पाण्याच्या टाक्या, झाडाच्या कुंड्या, झाडे यांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यांच्या या उपद्रवामुळे झाडे, फळे, फुले यांचे नुकसान होत आहे.
 
घराबाहेर कोणत्याही गोष्टींचे वाळवण घालता येत नाही. इतकेच नव्हे तर घराची दारे, खिडक्या उघड्या ठेवणेही अवघड झाले. घरात शिरुन माकडे अन्नधान्य, भाजीपाला यांची नासाडी करत आहेत. वाळत घातलेले कपडेदेखील फाडून टाकतात. यामुळे मोठी आर्थिक हानी होत आहे. अनेकदा ही माकडे वाहनांवरदेखील उड्या मारतात, तर कधी टेरेसच्या पत्र्यावर धुडगूस घालतात. त्यामुळे या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
 
दरम्यान, माकडांना पकडण्याची कोणतीही आर्थिक किंवा इतर तरतूद वन विभागाकडे नाही. ग्रामपंचायत किंवा देवस्थान यांच्या आर्थिक मदतीतून माकडे पकडणारी टीम बोलवता येऊ शकते. नागरिकांनी माकडांना घरचे तसेच शिजविलेले अन्न खाण्यास देऊ नये. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे माकडांचा उपद्रव आटोक्यात येऊ शकेल, असे आवाहन सुधागड-पाली वन विभागानेे केले आहे.