इंस्टाग्राम ग्रुपवर महिला, अल्पवयीन मुलींना पाठवले अश्लिल मेसेज, फोटो!

मुरुड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By Raigad Times    07-Nov-2021
Total Views |
social media crime_1 
 
अलिबाग । इंस्टाग्रामवर  फ्रेंड्स ग्रुप तयार करुन, त्यावर अश्लिल मेसेज, फोटो पाठवून अल्पवयीन मुलींसह महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार मुरुडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
17 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने इंन्स्टाग्राम या सोशल नेटर्किंगचा वापर करुन iamqueen00171 नावाने बोगस इंन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले व यातील महिला फिर्यादी (रा.विहूर मुरुड) व इतर मुलींना फे्रंड रिक्वेस्ट पाठवली.
 
ही फ्रेंड रिक्वेस्ट फिर्यादी व इतर मुलींनी न स्वीकारता, सदर अकाऊंट ब्लॉक केले. त्यामुळे सदर अज्ञात इसमाने फ्रेंड्स इंन्स्टाग्राम ग्रुप तयार करुन त्यामध्ये फिर्यादी व इतर मुलींना त्यांच्या संमतीशिवाय अ‍ॅड केले. यामध्ये काही मुलींचाही समावेश होता.
 
सदर ग्रुपवर अश्लिल मेसेज व छायाचित्रे पाठवून सदर इसमाने फिर्यादी महिला व इतर पीडित मुलींचा विनयभंग केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, फिर्यादी महिलेने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.
 
याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 354 (ए), 509, पोक्सो कायदा कलम 12, 18, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2008 कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.