लसवंत व्हा, आयुष्यवंत व्हा!

By Raigad Times    06-Nov-2021
Total Views |
raigad times_1  
 
राजन वेलकर/अलिबाग  
 
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण...शहरातून आता ही दिवळी छोट्या शहरापर्यंत आणि आता गावा-गावात डोकावू लागली आहे. एरव्ही शेतकर्‍यांसाठी हे दिवस म्हणजे सुगीचे दिवस. शेतात पिकलेले मोती वेचून घरात आणण्याची शेतकर्‍यांची घाई असते. अगदी दिवे लागणीपर्यंत अंगणामध्ये झोडण्या-मळण्या सुरु असतात. घराचे कोपरे धान्यांच्या पोत्यांनी भरलेले असतात. नव्या धान्याची भाकरी, भाताचे पोहे बनवले जातात. पावसाने साथ दिली तर खर्‍या अर्थाने ही दिवाळी शेतकर्‍यांसाठी सोन पावलाने आलेली लक्ष्मीच असते.
 
गेल्या दोन वर्षांत कोरोनासोबत कोकणात तीन वादळं येऊन गेली. निसर्ग वादळाने तर रायगडसह कोकणाला झोडून काढले. एक झाड धड उभे राहिले नव्हते, अनेक जुने वृक्ष कोलमडून पडले. लोकांच्या घरांवर पत्रे राहिले नाहीत. कितीतरी घरे कोसळली. कोट्यावधीचे नुकसान झाले. बागायती उद्ध्वस्त झाल्या. यंदाही अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहेच; तरीही तुलनेने शेती बरी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्याही चेहर्‍यावर आनंद तरंग आहेत.
 
कोरोनाही आता हळूहळू काढता पाय घेताना दिसत आहे. प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. गेली दीड वर्षे कोरोनामुळे जगभर जणूकाही अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अनेक जीवाभावाची माणसं डोळ्यासमोर गेली. वर्षभरातले सण अक्षरशः सुतकी गेले. तो काळ आता आठवायलाही नको वाटतो. त्यामुळे वर्षभराने लस येत असल्याची बातमी आली तेव्हा माणसाला आशेचा किरण दिसू लागला. जगण्याची उमेद आणि हिम्मत येवू लागली.
 
सहा महिन्यांपासून देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. आतापर्यंत 106 कोटी 85 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्रात हा आकडा 9 कोटी 81 लाख इतका आहे. रायगड जिल्ह्यातील 87 टक्के म्हणजेच 18 लाख 63 हजार लोकांनी 470 कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 7 लाख 81 हजार 648 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेण्यार्‍यांची सरासरी 37 टक्के आहे.
 
कोरोना झालेलाही माणूस जगू शकतो, याचा विश्वास आता नागरिकांना येऊ लागला आहे. बर्‍याच महिन्यांनंतर नागरिक आपल्या जुन्या आत्मविश्वासाने वावरायला लागली आहे. बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. सरकारी, खाजगी वाहने पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहेत. छोटे व्यावसायिक नव्या दमाने पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडत आहेत. पर्यटक किनार्‍यांवर बागडताना दिसत आहेत. कोरोना काळात झालेली दोन वर्षांची जखम मोठी आहे, पण प्रत्येकजण आपापल्या जखमा भरण्याचा प्रयत्न करत आहे.
 
या दिवाळी पर्यंत सर्वकाही पूर्वपदावर येणे आनंददायी असले तरी निष्काळजीपणा कोणालाही परवडणारा नाही. त्यामुळे सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स शक्य तेव्हा पाळण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. दोन डोस घेतले म्हणून गाफील राहू नका, ‘मी लस घेतलीच नाही’ हा फाजिल विश्वास कोणीही बाळगू नका. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग खूपच धिमा आहे. 40 जिल्ह्यांमध्ये 50 टक्केदेखील लसीकरण झालेलेे नाही. त्यामुळे या दिवाळीच्यानिमित्ताने दोन डोस घेण्याचे देशाचे व्रत पूर्ण करा.
 
देशाचे पर्यायाने स्वतःचे आरोग्य निरोगी करा. शेवटी दिवाळीच्या सर्वांना खूप सार्‍या शुभेच्छा देताना इतकेच म्हणूया, “लसवंत व्हा, आयुष्यवंत व्हा ..!”
 
शुभ दिपावली!