खारघरमध्ये होणार ट्रॅफिक पार्क

27 Nov 2021 14:17:23
trafic_1  H x W
 
पनवेल | आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत, त्यांना लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम माहिती व्हावेत, या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका खारघर येते ट्रॅफिक पार्क साकारणार आहे. साडेनऊ हजार चौरस मीटर भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करणयात येणार असल्याचे पनवेल महापालिकेकडून सांगण्यात आले. यासाठी दहा कोटी रुपये खर्च येणार आहे.
 
आजच्या स्थितीला अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीसारखे प्रश्न निर्माण होतात. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थीदशेमध्येच वाहतुकीबाबत मुलं आणि मुली जागृत व्हावेत. त्यांचे प्रबोधन व्हावे व भविष्यामध्ये त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने पनवेल महानगरपालिका ट्रॅफिक पार्क उभारणार आहे.
 
खारघर येथे सेक्टर ३५ मधील प्लॉट क्रमांक ९ ए या जागेवर ९हजार ४०७ चौरस मीटर भूखंडावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. याकरिता आसीम ब्रोकर्स हवर्स ही कन्सल्टंट एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी याबाबतचा आराखडा तयार केला आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करून या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे.
 
ट्रॅफिक पार्कमध्ये या गोष्टी असणार, खारघर येथे साकारणार्‍या ट्रॅफिक पार्कमध्ये ५०० मीटर लांबीचा ड्रायव्हींग वे असेल. त्याचबरोबर पाथवेसुद्धा तयार करण्यात येणार आहे. येथे चार सिग्नल बसवण्यात येतील. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंग रम्बलरची सोय करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शहर हॉस्पिटल, शाळा अग्निशमन दल यांचे सिम्बॉल येथे बसविण्यात येणार आहेत. ट्रॅफिक रिलेटेड लाईट या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. जेणेकरुन रात्रीच्या वेळी ही ट्राफिक पार्कमध्ये विद्यार्थी व नागरिकांना माहिती देता येईल.
 
प्ले झोनची खास व्यवस्था, खारघर येथे विकसित करण्यात येणार्‍या ट्रॅफिक पार्कमध्ये प्ले झोन असणार आहे. येथे वाहतुकीसंदर्भातील खेळणी बसविण्यात येणार असून त्या माध्यमातून मुलांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले जाणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0