नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३१ डिसेंबर २०२४ ला झेपावणार पहिले विमान

By Raigad Times    27-Nov-2021
Total Views |
viman_1  H x W:
 
पनवेल | ३१ डिसेंबर २०२४ रोजी या नवी मुंबई विमानतळावरुन पहिले विमान उडेल, अशी माहिती मुखर्जी यांनी टि्वटरद्वारे दिली आहे. त्यामुळे ३ वर्षांनंतर पहिले विमान हवेत झेपावताना नवी मुंबई कराना पहायला मिळणार आहे. विमानतळासंबंधी सिडकोचे एम.डी. संजय मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाईन असलेले फोटो टि्वटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी २०२४ साली पहिले विमान उडण्याचे जाहीर केले आहे.
नामांतरणाचा मुद्दा गुलदस्त्यातच विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारने देशभरात एकसुत्री धोरण निश्चित करावे, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन धोरण निश्चित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावं, असं मत याआधी मुंबई उच्च न्यायालयाने केलं होते. नवी मुंबईतील विमानतळाला दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि माजी खासदार दि.बा. पाटील यांचे नाव द्यावं यासाठी २५ हजारांच्या संख्येने स्थानिक नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन केले. आद्यप हे आंदोलन पेटते ठेवण्यात आले आहे
 
वेगवेगळ्या कारणामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाला वारंवार ब्रेक लागत गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये फेब्रुवारी २०१८ रोजी या विमानतळाच्या कामकाजाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली होती. यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ रोजी या विमानतळावर पहिले विमान टेक ऑफ होईल, अशी माहिती दिली होती. या भूमिपूजन कार्यक्रमानंतर या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करत, आमच्या मागण्या मान्य केल्या नंतरच कामाला सुरुवात करा, अशी मागणी लावून धरली.
 
या कामाला १२१८ मध्ये ब्रेक लागल्या त्यानंतर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करुन २०१८ - २०१९ मध्ये भरावाच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे २०१९ ची डेडलाईन हुकली आणि ही डेडलाईन पुन्हा २०२० वर गेली. वारंवार डेडलाईन बदलत गेल्याने या विमानतळाचे कामकाज पूर्ण होईल की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी सिडकोचे एमडी संजय मिखर्जी यांनी ट्विटरवर ट्विट करून पहिले विमान कधी उडणार? याबाबत माहिती देऊन, अनेक प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.
 
३१ डिसेंबर २०२४ रोजी पहिले विमान उडेल, अशी माहिती त्यांनी ट्विट दिली आहे. त्यासोबत विमानतळाच्या इमारतीचे तसेच धावपट्टीचे फोटोदेखील त्यांनी ट्विट केले आहेत. नवी मुंबई आणि पनवेलच्या मध्यभागी जवळपास २४ हजार कोटी खर्च करत हे विमानतळ उभे राहत आहे. वर्षाला ६० लाख प्रवासी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करणार आहेत.
 
विमानतळाच्या काही अंतरावर जेएनपीटी बंदर असल्याने याचा मोठा फायदा विमानतळाला होणार आहे. त्यातून वर्षाला १ लाख ५० हजार मेट्रिक टन कार्गो देश विदेशात जाणार आहे. या विमानतळामुळे १ लाख थेट तर २.५ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.