अलिबागचा प्रशांत कावजी ठरला रायगड श्री

बेलोशी येथील शरीरसौष्ठव स्पर्धा नेरळचा योगेश बारशी बेस्ट पोझर

By Raigad Times    27-Nov-2021
Total Views |
prashant kavji_1 &nb
 
रेवदंडा | जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन व माजी अलिबाग पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रायगड श्री २०२१’ शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचा प्रकाश कावजी ‘रायगड श्री २०२१’चा मानकरी ठरला तर बेस्ट पोझरचा किताब नेरळ येथील योगेश बारशी याने पटकावला.
 
अलिबाग तालुक्यात बेलोशी येथील राजिप शाळेच्या प्रांगणात २४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या स्मरणार्थ अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर भोपी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रायगड श्री २०२१’ शरीरसौष्ठव स्पर्धा जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून व जोशी फिटनेस सेंटर वावे व कुलस्वामिनी मित्रमंडळ बेलोशी यांच्या सहकार्याने घेण्यात आली.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यायामशाळेतील शरीरसौष्ठव स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांमध्ये अलिबाग, उरण, पेण, कर्जत, नेरळ, पनवेल, मुरुड, महाड, खोपोली, रोहा आदी ठिकाणांहून स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेचा प्रारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
 
यावेळी आयोजक श्रीधर भोपी, कामगार नेते अनंता गोंधळी, ऍड.श्रध्दा ठाकूर, ऍड उमेश ठाकूर, बेलोशी सरपंच कृष्णा भोपी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा तेलगे, अलिबाग पंचायत समिती सदस्या ताई गडकर, बेलोशी ग्रामपंचायत उपसरपंच गीताजंली पारंगे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर भोपी, राकेश भोपी, ऍड. कौस्तुभ पुनकर आदी ग्रामपंचायत सदस्य व बेलोशी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र कॉंग्रेस सरचिटणीस ऍड.प्रविण ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली.
  
स्पर्धेसाठी अध्यक्ष परशुराम चव्हाण-रोहा, उपाध्यक्ष प्रभाकर मोहिते अलिबाग, किरण कोसमकर-अलिबाग, गजानन पाके-अलिबाग, राजेश गुप्ते-मुरूड, आशिष खोत-मुरूड, दर्शन जाधव-महाड, शरद म्हात्रे-अलिबाग, प्रसाद सावंत-महाड, कौस्तुश्रभ पापलखोपोली, सिध्दार्थ संसारे- पेण, प्रतिक पाटीलअलिबाग, शाम धाटाव र रोहा, चंद्रमणी जाधव-माणगांव,सुनिल राणे-अलिबाग व किरण भगत यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण भगत व रूपेश पाटील-महाजने यांनी केले. स्पर्धेत एकूण १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
 
पाच गटातील प्रथम विजेत्या स्पर्धकांमध्ये ‘रायगड श्री २०२१’साठी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अलिबाग डिव्हीने एनर्जी व्यायामशाळेचा प्रकाश कावजी रागयड श्री २०२१ चा मानकरी ठरला तर नेरळच्या बलित क्लबचा योगेश बारशी यांनी बेस्ट पोझरचा किताब पटकाविला.
 
स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम माजी अलिबाग पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी, बेलोशी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा भोपी, मान्यवराचे हस्ते संपन्न झाला. स्पर्धा संपन्न होण्यासाठी जोशी फिटनेस सेंटर वावे, व कुलस्वामिनी मित्रमंडळ बेलोशी व राकेश भोपी व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.