‘बाटू’ नाही! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ म्हणा...

26 Nov 2021 22:25:55
Bharat Ratna Dr. Babasahe
 
विद्यापीठ परिसरात डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
 
माणगाव । आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा, असा क्षण आहे. लोणेरे विद्यापीठ परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते झाले, याचा आनंद आहे, अशा भावना व्यक्त करतानाच, लोणेरे विद्यापीठाला यापुढे ‘बाटू’ न म्हणता हे विद्यापीठ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ याच नावाने ओळखले जावे, असा आदेश आपल्याकडून लवकरच काढला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
 
माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी (26 नोव्हेंबर) दुपारी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाला रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनील तटकरे, आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.अनिरुद्ध पंडित, राजिपचे माजी सभापती अ‍ॅड.राजीव साबळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राजिप सदस्या अमृता हरवंडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, सुजित शिंदे, बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगाव संस्थापक पंकज तांबे, उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य नथुराम करकरे, प्रकाश टेंबे,संजय घोसाळकर, विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी, पालक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bharat Ratna Dr. Babasahe
 
पुढे बोलताना, ना. उदय सामंत म्हणाले की, विद्यापीठ व लोकप्रतिनिधींचा संवाद महत्वाचा आहे. स्थानिक आमदार, पालकमंत्री, खासदार यांच्या निधीतून विद्यापीठाचे बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतात. बॅरिस्टर अंतुलेंनी या विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाला गेल्या पाच वर्षांत आपण 20 कोटींचा निधी दिला असून यापुढेही 25 कोटी रुपये विद्यापीठाला देण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे.
 
या विद्यापीठ परिसरात लवकरच शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करू. या पुतळ्याचे काम जानेवारी महिन्यात सुरु करून पुढील संविधान दिनी या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या पुतळ्यांची निगा राखणे व स्वच्छता राखणे, ही विद्यापीठ तसेच विद्यापीठातील कर्मचार्‍यांची जबाबदारी आहे. जगातील एक आदर्श असे विद्यापीठ आपल्याला तयार करायचे असून या विद्यापीठातून चांगले विद्यार्थी घडावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Bharat Ratna Dr. Babasahe
 
पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या ठिकाणाहून आपण हे पूर्णाकृती पुतळे बघू, तेव्हा विद्यापीठाची इमारतही अधिक चांगली दिसली पाहिजे. ना.सामंत यांनी विद्यापीठाची इमारत चांगली दिमाखदार पद्धतीने उभी रहावी, यासाठी तरतूद करावी. तसा प्रस्ताव विद्यापीठाकडून आपल्याला सादर केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. खा.सुनील तटकरे यांनी लोणेरे विद्यापीठ हे जगातील नामवंत असे विद्यापीठ असून रायगड जिल्ह्याची एक शान असल्याचे म्हटले. आ.भरत गोगावले यांनी या विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात जागा देणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांचाही विचार झाला पाहिजे, अशी मागणी केली.
 
या समारंभाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.अनिरुद्ध पंडित यांनी केले. हा समारंभ उत्साहात पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.अनिरुद्ध पंडित, कुलसचिव प्रा.डॉ.भगवान जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0