खांदेश्वर: खांदेश्वर येथील एक 6 वर्षांच्या मुलाचा अपहरण करुन दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्या दोघांना इसमाला खांदेश्वर पोलीसांनी अवघ्या 4 तासात बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाला विरोध करणार्या मामाला धडा शिवकण्यासाठी हा सर्व कांड भाची व तिच्या नवर्यांने केल्याचे पुढे आले आहे.
विनय गामा सिंग हे सहा वर्षाचा मुलगा व पत्नी पिंकी सिंग विचुंबे येथे राहतात. सहा तास दिवसांपूर्वी त्यांची 19 वर्षीय भाची मनीषा (नाव बदलले आहे) ही देखील त्यांच्यासोबत रहात होती.
23 नोव्हेंबर रोजी मनीषा मेडिकल स्टोरमध्ये जाण्याच्या बहाण्याने विनय सिंग यांच्या मुलाला घेवून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ झाला तरी ती परतली नाही. याचदरम्यान पिंकी सिंग यांना, अज्ञात इसमाने भाची व मुलगा आपल्या कब्जात असून दहा लाख रुपये दिले नाही तर त्यांना ठार मारू असा धमकीवजा मेसेज मोबाईलवर केला. त्यामुळे घाबरलेल्या विनय गामा सिंग यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशन गाठले.
खांदेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. पोलीसांना तपासात धमकी देणारा इसमाचा मोबाईल छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे लोकेट झाला. मात्र काही काळानंतर त्याचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. दरम्यान, थोड्याच वेळात त्याचे लोकेशन बांद्रा खार असे दिसू लागले.
देविदास सोनवणे यांनी तातडीने तीन टीम बनवून त्यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस, बांद्रा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाऊन तपास करण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त आणखीन एक टीम कल्याण येथे रवाना केली. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होते कारण जर आरोपी बाहेर गावी जाणार्या ट्रेनमध्ये बसून मुंबईबाहेर गेला असता तर त्याला शोधणे खूपच जिकरीचे होते.
अखेरीस खांदेश्वर पोलीस टीमने बांद्रा येथे दोन्ही मुलांना शोधण्यात यश आले. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी मात्र पळून गेला मात्र पोलिसांनी अवघ्या दोन तासात विपिन हिरालाल अग्रहरी याला ताब्यात घेतले. आधीक चौकशीअंती एका क्लिष्ट अपहरण नाट्या वरचा पडदा उठला.
या अपहरण नाट्याच्या पाठीमागची सूत्रधार तक्रारदार विनय सिंग यांची भाची मनिषाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीने नवरा विपिन हिरालाल अग्रहरी याला सोबत घेवून हे सर्व घडवून आणले होते. विपिन अग्रहरी आणि मनिषा हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे वास्तव्यास असून सहा महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केले आहे.
मनीषाच्या लग्नात तिच्या घरच्यांचा विरोध होता त्यात तिचा मामा विनय यांचा प्रखर विरोध होता. मामाला आद्दल घडविण्याच्या उद्देशाने मनीषाने तिच्या नवर्याबरोबर मिळून अपहरण नाट्य रचले होते. परंतु व पो नी देविदास सोनवणे यांच्या सारख्या खमक्या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या पोलीस तपास अभियाना समोर त्यांचे हे अपहरण नाट्य अवघे चार तासच टिकू शकले. मनिषा आणि विपिन हिरालाल अग्रहरी यांना अटक करण्यात आले असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या तपास अभियानात पोलीस निरीक्षक, गुन्हे डी. डी. ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे. पोलीस उपनिरीक्षक निलेश पोळ, किरण वाघ, पोलीस हवालदार सुदर्शन सारंग,महेश कांबळे, विषाल घोसाळकर, चेतन घोरपडे, सचिन सरगर, संभाजी गाडे तर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी व पथक, तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे,जाधव व पथक, कळंबोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बच्छाव व पथक, गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे प्रवीण पाटील व पथक यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे करत आहेत.