जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर; 21 डिसेंबरला मतदान

आजपासून आचारसंहिता लागू

By Raigad Times    24-Nov-2021
Total Views |
 nivadnuk ayuog_1 &nb
 
मुंबई । रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या असून यासाठी आजपासूनच आचारसंहीता लागू झाली आहे. 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे.
 
राज्यातील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
 
मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणार्‍या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.
 
यासाठी 1 ते 7 डिसेंबर कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होईल.
 
राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली या सहा नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे येथे प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
 
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे
ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर