रायगड : राज्यभरात सुरु असणारा एसटीचा संप दोन आठवडे झाले तरी संपायचे नाव घेत नाही. संप मिटायचा तर सोडाच, याउलट अधिकच चिघळत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील आत्तापर्यंत 79 जणांना निलंबित करण्यात आले असून 103 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यातील अनेक एसटी कामगार संघटना एकत्र येऊन या संपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यातील संपूर्ण एसटी सेवा ठप्प झाली असून रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाला आहे. सुरुवातीला एसटीचा संप एक-दोन दिवसानंतर मिटेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र संपकरी आणि राज्य शासन हे दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हा विषय न्यायालयात गेल्याने आता हा संप चिघळणार याची खात्री झाली होती. मात्र संपकरी काही केल्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने हे संप मोडीत काढण्यासाठी शासनाने संपकरी कर्मचार्यांचे निलंबन करण्याची सुरुवात केली.
टप्प्याटप्प्याने केलेल्या निलंबनाचा आकडा आजमितीला रायगड जिल्ह्याचा 79 वर जाऊन ठेपला आहे. मात्र संपकरी कर्मचारी राज्य शासनाच्या या कारवाईला न घाबरता आणि न डगमगता आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने शासनाने दुसरा पर्याय म्हणजे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी परिवहन खात्याच्या खाजगी वाहनांना एसटीच्या दरात प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत, राज्य शासनाने तेथेही न थांबता कंत्राटी कामगारांकडे आपला मोर्चा वळवला आणि हजारो कंत्राटी कामगारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यास सुरुवात केली.
रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधील 103 कंत्राटी कर्मचार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आम्हाला या नोटीस आल्या तरी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून राज्यातील आत्महत्या केलेल्या कर्मचार्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत आणि त्यामुळे आम्ही कामावर जात नाहीत असे या कंत्राटी कर्मचार्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी आणि राज्य शासन या दोघांमधील अडमुठेपणामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
यात विना पासधारक आणि पासधारक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एसटीला होणार्या लाखो रुपयांच्या उत्पन्नात घट तर झालीच आहे, शिवाय विद्यार्थ्यांच्या विश्वासास प्राप्त ठरलेल्या एसटीतून जे विद्यार्थी प्रवास करत होते त्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून खाजगी वाहनांमधून अधिकचे पैसे खर्च करून प्रवास करणे भाग पडत आहे
---------------------------------------
शासनाने आम्हा कंत्राटी कामगारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. मात्र ही बजावलेली नोटिस चुकीची आहे. एसटी महामंडळातील कर्मचार्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, वेळेवर न मिळणारा बोनस व इतर सोयीसुविधा यांमुळे राज्यातील अनेक कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही बसलो आहोत आणि म्हणून आम्ही कामावर जात नाहीत. आम्हा कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावून शासनाने आमच्यावर अन्याय केला आहे.
- रामदास पाटील, वाहक
-----------------------------------------
लॉकडाउन नंतर शाळा महाविद्यालये सुरू झाली असल्याने आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळीदेखील एसटीचा प्रवास करण्यासाठी मासिक, त्रैमासिक पास काढले होते, मात्र अचानक एसटीचा संप सुरू झाल्याने आम्ही एसटीच्या प्रवासापासून वंचित राहिलो आहोत, मात्र आता शाळा महाविद्यालयात जाताना खाजगी वाहनांमधून प्रवास करताना आम्हाला जादा पैसे द्यावे लागत आहेत, त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे.
- आकाश मोकल, प्रवासी विद्यार्थी, कळव