पेण : पाण्यासाठी शेकापचा एमजेपीच्या कार्यालयावर मोर्चा

31 मार्चपर्यंत योजना पूर्ण करण्याचे अधिकार्‍यांचे आश्वासन

By Raigad Times    23-Nov-2021
Total Views |
Pen water shortage_1 
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागील अनेक दशकांपासून सुटत नसल्याने आज (23 नोव्हेंबर) पुन्हा एकदा या भागातील जनतेने शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. या आंदोलनात प्रामुख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. 31 मार्च 2022 पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उपस्थित अधिकार्‍यांनी पुन्हा आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलनाची सांगता झाली.
 
अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 2017 मध्ये पेण ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकारण न आणता व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी 29 कोटी 36 लाख रुपये मंजूर करून कामसुद्धा सुरू करण्यात आले होते.
असे असताना या योजनेचे काम 4 वर्षे पूर्ण होऊनदेखील पूर्ण होत नसल्याने आणि ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे या कामाला गती मिळत नसल्याने हे कामच ठप्प झाले होते. त्यामुळे हा प्रश्न असाच प्रलंबित राहिल्याने आजही हा भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचितच राहिला आहे. म्हणूनच या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरावा, यासाठी आज पुन्हा एकदा शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
 
जीवन प्राधिकरण कार्यालयाचे असिस्टंट कमिशनर चंद्रकांत गजबीये यांनी पेण वाशी नाका येथे येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सदर पाणीपुरवठा योजना येत्या 31 मार्च 2022 अखेरपर्यंत पूर्ण करून खारेपाट भागाला पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन दिले. या कामाबाबत चार महिन्यांतील आढावा घेण्यासाठी आंदोलकांची समिती तयार करून प्रत्येक महिन्याच्या अखेरीस कामाची प्रगती कशाप्रकारे सुरु आहे, हेदेखील पाहण्यात येणार आहे.
 
सदर आंदोलनाला आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निलीमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, डी.बी. पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, संदेश ठाकूर, प्रफुल्ल म्हात्रे, स्वप्नील पाटील, अरुण शिवकर, संजय डंगर, नंदा म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.