राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचा तडकाफडकी राजीनामा

कोणतेही महामंडळ स्वीकारणार नाही...

By Raigad Times    23-Nov-2021
Total Views |
Suresh Lad Karjat_1 
 
  • आघाडीचे राजकारण ठरतेय मारक
  • कार्यकर्त्यांची घुसमट थांबविण्याचे पक्ष नेतृत्वाला आवाहन
कर्जत । महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना सर्वत्र आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवाव्यात, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे. आम्ही आघाडीचा धर्म पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत, मात्र कर्जत-खालापूर तालुक्यात शिवसेना स्वबळाचा नारा देत आहे. पक्षाचा निर्णय मान्य करणे आपल्यावर बंधनकारक असल्याने होणारी घुसमट आपल्या तत्वांना पटणारी नाही. पक्षनिष्ठा महत्वाची असून पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पदावरुन स्वतःहून दूर होत असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
 
आज (23 नोव्हेंबर) कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने कोणतेही महामंडळ दिले तरी घेणार नाही, असे सांगतानाच अन्य राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. राष्ट्रवादीमध्येच राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे लाड यांनी जाहीर केले.
 
सव्वा वर्षांपूर्वी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. पक्षाचे सरचिटणीस खा.सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या लाड यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आल्यानंतर ते अनेक वर्षे राहील असे बोलले जात होते. मात्र स्वतःच्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील राजकारणाला कंटाळून, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या तक्रारींवर लक्ष देत नसल्याने पक्षाच्या जोखडात अडकून पडण्यापेक्षा आपल्याला स्वतंत्र मिळावे, यासाठी पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याचे सुरेश लाड यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रायगड जिल्ह्यात असताना जिल्हाध्यक्ष हे दिवेआगर येथील कार्यक्रमाला उपस्थित न राहता पत्रकार परिषद घेऊन पदाचा राजीनामा असल्याचे जाहीर करीत होते. मात्र केवळ पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याचे जाहीर केले नाही तर सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पाठवून दिला आहे.

Suresh Lad Karjat_1 
 
तीन पक्षांच्या सरकारमधील आघाडीचा धर्म पाळण्याच्या सतत केल्या जात असलेल्या आदेशाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे असल्याचे लाड यांनी म्हटले आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यात पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करण्याचे पक्षाच्या नेत्यांसमोर मान्य केले होते, पण राज्यातील सत्तेत असलेल्या आघाडीमधील शिवसेना दोन्ही तालुक्यात स्वबळाची भाषा करीत आहे. अशावेळी आपली भूमिका पक्षाच्या आदेशाला किंवा निर्णयाला मारक ठरु नये, यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे लाड म्हणाले.
 
तीन पक्षांचे सरकार असताना स्थानिक आमदार त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह लावून विकास कामांची भूमिपूजने करतात. प्रशासकीय भवनाच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न केले होते, त्यावेळी आपल्याला न बोलावण्याचा आदेश स्थानिक आमदारांनी अधिकार्‍यांना दिला. त्यानंतर आपण तेथे जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, मात्र त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर ज्या पद्धतीने भाषणे करून सर्व राजकीय अधिनिवेश बाजूला ठेवले याबद्दल आम्ही पक्ष नेतृत्वाला कळवले.
 
मात्र आजपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्यावर आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले जात होते. परंतु शिवसेनेच्या आमदाराला मोकळे रान सोडले जात असल्याने आपल्याला पक्षाचे कर्जत-खालापूर तालुक्यात काम करण्यासाठी स्वतंत्र्य मिळावे, यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुरेश लाड यांनी स्पष्ट केले.
 
मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उमेदवाराचे काम केले. तेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेना आमदारांसोबत गुप्त बैठका घेत आहेत, हे कोणासाठी आणि कशासाठी? हे कळत नाही. ते कोणाचा काटा काढणार आहेत? हे पक्ष नेतृत्वाला कळावे, यासाठी एक जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार असलेली व्यक्ती राजीनामा देत असल्याचे सुरेश लाड यांनी जाहीर केले.
 
मी पक्षावर नाराज नाही. भविष्यातही राष्ट्रवादीचे काम करणार आहे. मी राज्य सरकारच्या कोणत्याही महामंडळावर जाण्यास इच्छुक नाही. पक्षाने कोणतेही महामंडळ आपल्याला दिल्यास ते स्वीकारणारही नाही, असेही सुरेश लाड यांनी जाहीर करुन टाकले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत ‘दिल्ली अभी बहुत दूर हे’ असा सूचक इशारा त्यांनी दिला.
 
आपल्या कार्यपध्दतीला कंटाळून सुरेश टोकरे आणि दत्तात्रय मसूरकर नाराज आहेत काय? आणि त्यामुळे टोकरे भाजपच्या वाटेवर आहेत काय? या पत्रकारांच्या प्रश्नावर सुरेश लाड यांनी शिवसेनेतून सुरेश टोकरे राष्ट्रवादीत आल्यावर त्यांना जिल्ह्याचे कार्याध्यक्षपद दिले. त्यांना पक्षात पुन्हा आले म्हणून मागे बसवले नाही आणि त्यामुळे ते आपल्यावर नाराज असल्याचा प्रश्न नाही. त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केला नाही. ते आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच आहेत, असे सुरेश लाड यांनी स्पष्ट केले.
 
कर्जत आणि खालापूर तालुक्यात आगामी काळात नगरपालिका, नगरपंचायत आणि नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. त्या निवडणुका पक्ष पातळीवरुन वरिष्ठ आघाडी करुन लढण्याचे सांगत आहे. पण शिवसेनेने कर्जत पंचायत समितीमध्ये शेकापला उपसभापतीपद देऊन स्थानिक आमदार आपल्याला विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड केली, असे जाहीरपणे सांगत आहेत.खोपोलीमध्येही परतफेडीचे राजकारण सुरु आहे काय? असा प्रश्न सुरेश लाड यांनी उपस्थित करीत त्यांना केलेल्या मदतीच्या राजकारणात आपला सामान्य कार्यकर्ता भरडला जाऊ नये, यासाठी आपल्याला पक्ष दबाव टाकू नये यासाठी जिल्हा अध्यक्षपद सोडत असल्याचे म्हटले.