रायगडकरांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवले विकासाचे स्वप्न

गोवा महामार्गापासून, सागरी महामार्गापयर्ंत सर्वच विषयांना घातला हात

By Raigad Times    23-Nov-2021
Total Views |
ajit pawar in shriwardhan
 
श्रीवर्धन । महाराष्ट्राच्या दृष्टीने कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी हे शासन सदैव प्रयत्नशील आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी विविध प्रस्तावित विकासकामांचे स्वप्न रायगडकरांना दाखवले.
 
ajit pawar in shriwardhan
 
 श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना, राष्ट्रीय गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार चर्चा करत आहे. रायगड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
 
कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनार्‍यावरील बीच शँक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर, अशा विविध विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आश्वासक भाष्य केले.
दिवेआगार ग्रामपंचायत व ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा करून उपमुख्यमंत्री पवार यांनी, दिवेआगर समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा अशी सुचना यावेळी केली आहे.
 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोकण विभागातील विकासकामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे सहकार्य मिळत असून महाविकास आघाडीचे हे शासन राज्यातील प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिले आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून आता कोकण विभागात पर्यटनाबरोबरच शैक्षणिक विकासासाठीही उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
 
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना, येत्या काही काळात सागरी महामार्गाचा विकास, कोकण विभागातील समुद्रकिनार्‍यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास अशा विविध माध्यमातून कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. दिवेआगर येथील साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा विकसित केल्यास येथील पर्यटनही विकसित होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
दरम्यान, चोरीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी रायगड पोलीस दलामार्फत पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच 2 कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली असून यावेळी या योजनेचे देखील अजित दादा पवार यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले.
 
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे जेष्ठ प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या अभंगवाणीने करण्यात आली. प्रास्ताविक दिवेआगार चे सरपंच उदय बापट यांनी केले तर सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.
 
यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कांबळे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड, संजय शुक्ला, संजय शितोळे, अ‍ॅड. प्रसाद पाटील, अ‍ॅड. ए.सी.गावंड, अ‍ॅड. भूषण साळवी, अ‍ॅड. विलास नाईक, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स, पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, महेंद्र शेलार, विराज काशिनाथ पाटील, श्रीमती अनिता घडशी, श्रीमती उषा भगत, माया हिर्‍या चौगुले, सचिन निजामपूर, सचिन खैरनार, संजय खोपकर, रत्नाकर शिरकर, उल्हास खोपकर, देवेंद्र नार्वेकर, परिमल भावे, पत्रकार वैभव तोडणकर आदिंचा सन्मान करण्यात आला.