कर्जत तालुक्यातील राजकारणी आरक्षणाच्या प्रतीक्षेत

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु

By Raigad Times    20-Nov-2021
Total Views |
Raigad Zilla Parishad_1&n
 
कर्जत । रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. त्यात आता राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारुप आराखडा बनविण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राजकीय पक्षांनी येथील सहा प्रभागांत निवडणूक लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, तालुक्यातील आदिवासी भागाचा विचार करता सहा पैकी किती प्रभाग आरक्षित होणार? याकडे राजकीय मंडळींचे लक्ष असून, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षण लक्षात घेऊन खुल्या जागांवर जोरदार लढती होण्याची शक्यता आहे.
 
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा प्रभाग असून मागील निवडणुकीत त्यातील दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. तर दोन प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि दोन गट हे सर्वसाधारण उमेदवार यांच्यासाठी खुले होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही अशाच पद्धतीने सहा प्रभागात आरक्षण राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील खांडस आणि पाथरज हे जिल्हा परिषद गट आदिवासी मतदारांचे बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे दोन्ही प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे.
 
तालुक्यात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप या दोन पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळविला होता. तर शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला होता. मात्र यावेळी राजकीय गणिते बदलली असून राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे सूत जुळत नाही. तर राष्ट्रवादी-शेकाप हे जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेले पुन्हा निवडणुकीला एकत्र राहून सामोरे जातील काय? हेदेखील आजतरी निश्चित नाही. त्यात भाजपदेखील तयारीनिशी स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी सोपी नाही.
 
संभाव्य आरक्षण लक्षात घेता कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार तयार केले आहेत. तालुक्यातील पहिल्या समजल्या जाणार्‍या खांडस गटात ज्येष्ठ कार्यकर्ते भरत भगत, शिवराम बदे, रामचंद्र बदे, उत्तम शेळके आणि राहुल विषे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून माजी सभापती धोंडू राणे, शेकापकडून अनिल जोशी, रवींद्र झांजे, प्रकाश फराट यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पहिले जात आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचा पूर्वीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या गटात आणि मागील निवडणूक चार हजार मतांजवळ पोहचलेला भाजप देखील स्पर्धेत आहे.
 
पाथरज गटात यावेळी दोन विद्यमान सदस्य यांच्याकडून कोणाला रणांगणात उतरवले जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे. सावेळे गटात सर्वाधिक इच्छुक पाहायला मिळत असून सेनेकडून बाबू घारे, मनोहर थोरवे, सुदाम पवाळी, राजेश जाधव आणि आणखी काही इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोक भोपतराव आणि सुनील घोडविंदे यांची नावे चर्चेत आहेत.
 
नेरळ जिल्हा परिषद गटात विद्यमान सदस्य अनसूया पादीर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढतील असे वाटत नाही, मात्र काँग्रेस पुन्हा जेष्ठ कार्यकर्त्याला घेऊन उतरु पाहत आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि तालुकाध्यक्ष भगवान चंचे यांच्यापैकी एक लढू शकतो. तर शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव आणि एकदा पराभूत झालेले रोहिदास मोरे तसेच माजी उपसरपंच गुरुनाथ मसने, हनुमंत भगत यांच्यासह काही तरुण उमेदवार स्पर्धेत आहेत. भाजपकडून तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर आणि नरेश मसने यांची नावे स्पर्धेत आहेत.
 
उमरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह युवक अध्यक्ष सागर शेळके हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तर सेनेकडून ज्येष्ठ कार्यकर्ते भीमसेन बडेकर तसेच माजी सभापती प्रदीप ठाकरे, अमर मिसाळ आणि विकास बडेकर यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो. भाजप आणि मनसे या गटात आपले नशीब जमवू शकतो.
 
तर बीड बुद्रुक या गटात विद्यमान सदस्य सुधाकर घारे यांचे नाव हा गट सर्वसाधारण राहिला तर आघाडीवर आहे. तर सेनेकडून संतोष भोईर, मनोहर थोरवे, अभिषेक गायकर यांची नावे स्पर्धेत आहेत. मात्र 50 टक्के आरक्षण लक्षात घेता तालुक्यात सक्षम महिला उमेदवार शोधण्याची मोठी कसोटी सर्व राजकीय पक्षांसाठी असणार आहे. त्यात विद्यमान तिन्ही महिला सदस्य पुन्हा निवडणुकीला सामोरे जातात का? की नवीन महिला उमेदवार राजकीय पक्ष निवडणुकीत उतरवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.