जिल्हा परिषदेच्या जागांना जिओ टॅगिंग होणार

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती

By Raigad Times    20-Nov-2021
Total Views |
Geo Tagging_1  
 
उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न
 
अलिबाग । जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांची माहिती संकलित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. या जागांना जिओ टॅगिंग होणार असून या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 
रायगड जिल्हा परिषदेची 18 ऑगस्ट 2021 ची तहकूब नियमित सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा परिषदेच्या कै. ना.ना. पाटील सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचा विषय या सभेत जास्त वेळा चर्चिला गेला.
 
यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा किती आणि कुठे आहेत? त्याच्यावर अतिक्रमणे किती आहेत? ही अतिक्रमणे कधी हटवणार? आदी प्रश्न विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी, सदस्य विजय भोईर, काळीजकर यांच्यासह सत्ताधारी पक्षातील शेकापच्या चित्रा पाटील यांनी उपस्थित केला.
 
यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी, जिल्हा परिषदेच्या जागांची माहिती संकलित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या अखत्यारितील जागांची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यावर किती अतिक्रमण आहे याची माहितीसुद्धा एकत्र करण्यात येईल. सदर माहिती सर्वसामान्य जनतेला पाहता येणार असून सूचना मांडता येणार आहेत.
 
जिल्हा परिषदेच्या जागांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार, असे सांगतानाच, या जागांचा उपयोग पर्यटन आदी योजना राबवून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी होऊ शकतो, असे किरण पाटील यांनी म्हटले आहे. काही जागा ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागणार असून ही सर्व प्रक्रिया दोन महिन्यांत सुरु होईल, असे सांगितले.
 
यावेळी जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती, ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन, वीज वितरण कंपनीने पथदिव्यासाठी ग्रामपंचायतीकडे आकारलेले वीज बील, हायमास्ट दिव्यांऐवजी सौर उर्जेवरील दिव्यांचा वापर, आरोग्य दाखला घेतला जात नसल्याने जिल्हा परिषदेचा बुडणारा महसूल, जिल्हा परिषदेची जुनी इमारत आदी विषयांवर या सभेत चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.
 
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, वाहनचालक यांच्या थकीत व अपु-या वेतनाचा मुद्दा चर्चेत आला. सदर कर्मचार्‍यांचे शासनाकडून वेळेत निधी येत नसल्याने या कर्मचार्‍यांचे पगार थकले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगून 84 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे त्याचे वाटप करण्यात आले आहे मात्र या कर्मचार्‍यांच्या अद्यापही काही महिन्यांचे वेतन देण बाकी असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम समिती सभापती निलिमा पाटील, समाज कल्याण समिती सभापती दिलीप भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी सभापती बबन मनवे, अतिरिक्त उप कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, आदी अधिकारी उपस्थित होते.