महाडला कॉलेजमध्ये कामाला होता...अवघ्या, दहा ते पंधरा मिनिटांत तो दिवसाढवळ्या घर साफ करुन पसार व्हायचा!

रायगड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By Raigad Times    02-Nov-2021
Total Views |
alibag 1_1  H x
 
रोख रकमेसह 15 लाखांचे दागिने हस्तगत
 
अलिबाग । महाडमधील एका कॉलेजमध्ये तो कामाला होता...मात्र भरदिवसा काळे कृत्य कारायचा. महाड परिसरात दिवसा चोरी करणार्‍या या चोरट्याला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रकमेसह 15 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. महाड, दापोली परिसरात 11 घरफोड्या केल्याची कबुली या चोरट्याने दिली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.
आज (2 नोव्हेंबर) रायगड पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक दुधे यांनी अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले या गावातील मूळचा संकेत अंजर्लेकर हा महाड येथील बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये लॅब टेक्नीशिअन म्हणून कार्यरत होता. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतलेला संकेत कामावर असतानाच फावल्या वेळेत परिसरात रेेकी करायचा.

alibag _1  H x
 
एखादे बंद घर दिसले की, अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तो दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरी करायचा. त्याने महाड, माणगाव, गोरेगाव, तळा परिसरासह अन्य अकरा ठिकाणी चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. संकेतला सुतारकाम येत असल्याने त्याला दरवाजाच्या कडीकोयंड्याबाबत चांगली माहिती होती. त्यामुळे 15 मिनिटांत तो घर साफ करुन पसार होत असे.
दिवसा चोर्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची गुन्हे अन्वेषणची टिम अ‍ॅक्शनमध्ये आली. पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांचे पथक कामाला लागले. यादरम्यान सदर चोरटा महाड नवेनगर येथे राहणारा असून संकेत अंजर्लेकर असे त्याचे नाव असल्याचे व तो मूळचा हर्णे-आंजर्ले येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
 
त्यानुसार पोलिसांनी संकेतचे मूळ गाव आंजर्ले गाठले आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 20 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.