अलिबाग : भारतीय किकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 25 वर्षांखालील सी . के . नायडू करंडक क्रिकेट सपर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्याकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) घेण्यात येणार्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभागीय संघात निवड करण्यात आली आहे.
रायगडच्या ॠषिकेश राऊत, प्रतिक म्हात्रे, सिध्दार्थ म्हात्रे यांची 15 जणांच्या संघात निवड करण्यात आली आहे. अभिषेक खातू व रितेश तिवारी यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. 2020 - 2021 मध्ये एमसीएने आयोजित केलेल्या आमंत्रीतांच्या स्पर्धेतील कामगिरी पाहून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.
महाराष्ट्राचा पश्चिम विभागीय संघ निवडण्यासाठी बुधवारी (दि. 17) कोल्हापूर येथे सभा झाली. या सभेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पश्चिमविभागीय संघात निवड झालेले रायगडचे पाचही खेळाडू मागिल काही वर्षे एमसीएच्या 14, 16 व 19 वर्षांखालील गटांच्या स्पर्धेत तसेच खुल्या गटाच्या स्पर्धेत रायगड संघाकडून खेळत आहेत.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकात मते यांच्यामुळे एकाच वेळी रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभागीय संघात निवड होऊ शकली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, अनिरूध्द पाटील, सचीव विवेक बहुतुले, राजेंद्र भावे, बशीर चिचकर, विजय उलवेकर, संतोष भोईर, प्रशांत ओक, सचिन मते, स्पर्धा समिती अध्यक्ष किरीट पाटील, निवड चाचणी समिती अध्यक्ष प्रीतम कैय्या तसेच इतर सदस्यांनी रायगडच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्राच्या पश्चिम विभागीय संघात निवड झाल्याबद्दल या खंळाडूंचे अभिनंदन केले.
“रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोरोनामुळे मागील दोन वर्षे स्पर्धा होऊ शकल्या नाहित. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या स्पर्धांंमुळेच रायगड जिल्ह्यात चांगले खेळाडू तयार होत आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या संघात संधी मिळत आहे. - चंद्रकांत मते, अध्यक्ष , रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन”