माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथील डायलेसिस सेंटरचे लोकार्पण

माणगावसह श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यातील रुग्णांना होणार लाभ

By Raigad Times    18-Nov-2021
Total Views |
Dialysis Center_1 &n
 
अत्यंत अल्प दरात डायलेसिस सुविधा उपलब्ध
 
अलिबाग । उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील डायलेसीस सेंटरचे आज (18 नोव्हेंबर) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. येथे अत्यंत अल्प दरात डायलेसिस सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आता गरजू रुग्णांना पनवेल वा इतर शहरात जावे लागणार नाही, असे पालकमंत्री म्हणाल्या.
 
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, सभापती अलका जाधव, सुभाष केकाणे, नगराध्यक्ष आनंद यादव, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, डॉ. दिपक देशमुख, नगरसेवक रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, रवींद्र मोरे, मुहम्मद धुंदवारे, रुपेश तोडकर, विद्युत पर्यवेक्षक संजय गांधी, डॉ. सुनिता कोकणे, मयूर शेठ, रुग्णालय कर्मचारी आदी उपस्थित होते.
 
पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, येत्या वर्षभरात अधिक मशिनरी माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात येतील. श्रीवर्धन, रोहा, पेण, कर्जत येथील येथील उपजिल्हा रुग्णालयातही लवकरच डायलेसिस सेंटर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या दीड-दोन वर्षांत आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन प्लांट अशा अनेक प्रकारच्या सुविधा माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दुर्दैवाने जर पुढील काळात करोनाची तिसरी लाट आलीच तर त्या परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सक्षम आरोग्य सोयी-सुविधा उभ्या केल्या आहेत.
 
रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रथमच माणगाव उपजिल्हा रुग्णलाय येथे डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यासह श्रीवर्धन, म्हसळा, तळा आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांना याचा लाभ होणार असून आता डायलेसिससाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने रुग्णांना या डायलेसिस सेंटरचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला दररोज 2 रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत डायलेसिस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली.