17 तारखेच्या जनसुनावणीकडे लक्ष
खोपोली (योगेश वाघमारे) । जैविक कचर्याची विल्हेवाट लावणारा प्रदूषणकारी एसएमएस कारखाना मुंबईतून आत्करगाव येथे येणार आहे. मानवी स्वास्थ्याला घातक असणारा कारखाना साजगांव पंचक्रोशीत नकोच, या मागणीसाठी सुरुवातीपासूनच ग्रामस्थ विरोध करत आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा विरोध राहील, असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थांची खरी ताकद 17 नोव्हेंबरच्या जनसुनावणीत दाखवून देणार असल्याचा इशाराही दिला आहे.
एसएमएस कारखान्याच्या जागेपासून 200 मीटर अंतरावर गाव नदी तसेच 500 मीटर अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आत्करगांव वाडी, बौध्दवाडा, जंगमवाडी जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्यामुळे हवा दूषित होऊन दुर्गंधी पसरेल. तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दूषित होऊन नदीवरील पाणी योजना दूषित होतील व साथीच्या आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
हे धोके लक्षात घेऊन ग्रामस्थांनी विरोध दर्शविताच 13 ऑगस्ट रोजीची जनसुनावणी रद्द करण्यात आली आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला; परंतु पुन्हा 17 नोव्हेंबर जनसुनावणी जाहीर होताच स्थानिक ग्रामस्थांनी खा.सुनील तटकरे, आ.जयंत पाटील यांच्या समक्ष भेट घेऊन सदर घटनाक्रम सांगितला व जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड यांनाही निवेदन दिले आहे. तसेच 14 नोव्हेंबर रोजी नियोजित कंपनीच्या फाटकासमोर ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली.
जैविक कचर्यावर प्रक्रिया करणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येऊ घातला आहे. या कारखान्यामुळे प्रदूषण होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ या कारखान्याला सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. या कंपनीला आमचा ठाम विरोध असून स्थानिक आमदारांच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हा कारखाना रद्द करु, असे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रविण पाटील यांनी म्हटले आहे.
कंपनीमुळे होणार्या प्रदूषणाचा त्रास माणसांबरोबर वन्य जीवांनाही होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ अशी शिकवण दिली. या कंपनीमुळे ही शिकवण आम्हाला अंमलात आणत कारखान्याविरोधात संघटीत होत संघर्ष करणार असल्याचे माजी सरपंच अनंत निरगूळकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थ संतोष पाटील, चंद्रकांत देशमुख, अशोक मोरे, योगेश देशमुख यांनी आक्रमक प्रतिक्रीया व्यक्त केल्यावर माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी एसएमएस कारखान्याच्या होणार्या जनसुनाणीदरम्यान मोठा विरोध करणार असल्याचा इशारा दिला आहे.