उरणचे हरहुन्नरी सर्पमित्र आनंद मढवी यांचे अपघाती निधन

मोटारसायकलवरुन जाताना डंपरने उडवले

By Raigad Times    15-Nov-2021
Total Views |
snake friend_1  

जेएनपीटी । उरण तालुक्यातील चिर्ले गावचे सुपूत्र, हरहुन्नरी सर्पमित्र, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंद हिराजी मढवी (वय 43) यांचे आज (15 नोव्हेंबर) अपघाती निधन झाले. चिर्ले गावातील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मढवी यांच्या अचानक जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
गेल्या 15 वर्षांपासून निसर्गातील वन्यजीवांना जीवदान देण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेले आनंद मढवी यांचा जन्म चिर्ले गावातील हिराजी मढवी यांच्या कुटुंबात झाला. जेएनपीटी बंदराजवळील गणेश बन्जोब्लास्ट या प्रकल्पात कार्यरत असणारे आनंद मढवी हे एक आदर्श कामगार नेते होते. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पशू-पक्ष्यांबरोबर सरपटणार्‍या प्राण्यांना जीवदान देण्याचे काम त्यांनी हाती घेतले. तसेच जाळ्यात झुडपात अडकून आजारी पडलेल्या पशूपक्ष्यांना औषधोपचार करुन आजारातून बाहेर काढले. त्यांना मुक्त संचारासाठी जंगलात सोडण्याचे कार्य कित्येकदा केले आहे.

snake friend_2  
 
अशा या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्पमित्र आनंद मढवी यांचे आज अपघाती निधन झाले. ते जेएनपीटी-पळस्पे महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन मोटारसायकलने जात असताना मागून येणार्‍या भरधाव डंपरने त्यांना चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच, उरणकरांना मोठा धक्का बसला.
 
त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंद मढवी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील व एक भाऊ, तीन भावजय असा त्यांचा मोठा परिवार आहे. चिर्ले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत, त्यांना निरोप दिला.