रायगड : रिलायन्स कंपनीविरोधातील आंदोलन चिघळले; आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By Raigad Times    15-Nov-2021
Total Views |
agitation against relianc
 
पाली/बेणसे । वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज (15 नोव्हेंबर) रिलायन्स नागोठणे कंपनीच्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीने कडसुरे येथे जनआंदोलन छेडण्यात आले. सायंकाळपर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले. यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
 
या आंदोलनात शिहू, चोळे, नागोठणे विभागातील प्रकल्पग्रस्त, वंचित बहुजन आघाडीचे रायगडसह राज्यातील नेते, पदाधिकारी यांनी सहभाग घेतला आहे. आता सहनशक्तीचा अंत झाला, सडून मरण्यापेक्षा लढून मरु, न्याय मिळेपर्यंत माघार नाही, अशी गर्जना प्रकल्पग्रस्तांनी केली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

agitation against relianc
 
याप्रसंगी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना कडसुरे मटेरियल गेटकडे जाऊ दिले नाही. त्यामुळे प्रवेशद्वारानजीक आंदोलकांनी ठिय्यया मांडला. यावेळी ‘प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो’, ‘कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
 
पूर्वीची आयपीसीएल व आताची रिलायन्स कंपनी यांनी स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याबरोबरच विविध प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 35 वर्षांपासून संघर्षमय लढा सुरु आहे. न्यायहक्कांसाठी अनेकदा विविध प्रकारची आंदोलने केली, मोर्चे काढले, आमरण उपोषण केले, तुरुंगवासही सोसला, मात्र आजवर समाधानकारक न्याय मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी आता न्यायहक्कांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.

agitation against relianc
 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष विश्वतेज साळवी यांनी आपला लढा रिलायन्ससोबत आहे, या लढ्यात जनशक्तीचे पाठबळ उभे करु, या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांसमवेत मोठी ताकत उभी करुया, असे आवाहन करतानाच जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा इशारा दिला. कंत्राटी पद्धतीने नोकर्‍या मान्य नाहीत, नोकरीत महिलांना प्राधान्य द्यावे, तसेच कायमस्वरूपी कामगार असलेल्या कामगारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी साळवी यांनी केली.
 
प्रकल्पग्रस्तांचे नेते गंगाराम मिनमीने म्हणाले की, रिलायन्स नागोठणे कंपनीने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अधिक अंत पाहू नये; अन्यथा आम्ही हे आंदोलन बाळासाहेबांच्या नेतृत्वात अधिक उग्र करु, असा इशारा दिला. यावेळी माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन नेते अनिल वाकोडे, लक्ष्मण भालेराव, सिद्धार्थ दाभाडे, सिद्धार्थ सोनावणे, सखाराम सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष सागर भालेराव, जिल्हा महासचिव महेश येलवे, जिल्हा सचिव लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

agitation against relianc
 
यावेळी प्रशासनाच्यावतीने रोहा तहसीलदार कविता जाधव, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पेण पोलीस उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक 7, सहायक पोलीस निरीक्षक 14, पोलीस कर्मचारी 150 आदी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.