माणगाव नगरपंचायतीच्या 17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित

15 Nov 2021 19:39:32
mangaon nagar panchayat_1
 
माणगाव । माणगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. नगरपंचायतीच्या 17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने ते नाराज झाले आहेत.
 
राज्य निवडणूक आयोगाकडील 12 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार माणगाव नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडतीकरिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या नियंत्रणाखाली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत आज (15 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11.30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथे माणगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडतीकरीता सुधारित आरक्षण व सोडतिचा कार्यक्रम घेण्यात आला.

mangaon nagar panchayat_1
 
माणगाव नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती. तद्नंतर आता 2021 मध्ये माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. कोविडमुळे या नगरपंचायतीची निवडणूक लांबणीवर पडली. मात्र आता पुन्हा कोविड आटोक्यात आल्याने त्यातच आरक्षण पडल्याने माणगावकरांना नगरपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत.
 
माणगाव नगरपंचायतीचा एकूण 17 वॉर्ड पैकी वॉर्ड क्र.1 अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्र.2 अनुसूचित जाती महिला, वार्ड क्र.11 अनुसूचित जाती सर्वसाधारण हे राखीव ठेवण्यात आले. तर वॉर्ड क्र.6 नामाप्र महिला, वॉर्ड क्र.8 नामाप्र महिला, वॉर्ड क्र.14 नामाप्र सर्वसाधारण, वॉर्ड क्र.17 नामाप्र सर्वसाधारण हे आरक्षण अशोकदादा साबळे विद्यालयालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी दिया विजय कराडे हिच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षित करण्यात आले.
 
तर वॉर्ड क्र.4 सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.7 सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.9 सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.10 सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्र.13 सर्वसाधारण महिला हे वॉर्ड मागील वेळेस महिलांसाठी राखीव नसल्याने यावेळेस महिलांसाठी आरक्षित घोषित करण्यात आले. तसेच उर्वरित वॉर्ड क्र.3 सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.5 सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.12 सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.15 सर्वसाधारण खुला, वॉर्ड क्र.16 सर्वसाधारण खुला आरक्षित घोषित करण्यात आले.

mangaon nagar panchayat_2
 
या आरक्षणामुळे गेले वर्षभरापासून इच्छुक असलेल्या अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे माणगाव नगरपंचायत हद्दीत ‘कही खुशी कही गम’ ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता संपूर्ण माणगावकरांचे लक्ष निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे लागून आहे.
 
या आरक्षण व सोडतीकरिता माजी नगराध्यक्ष आनंद यादव, राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रविंद्र मोरे, माणगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष महामूद धुंदवारे, राजा जाधव, माजी नगरसेवक सचिन बोंबले, नितीन वाढवळ, माजी स्वीकृत नगरसेवक हेमंत शेट, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश सुळे, भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, राजू मुंढे, मनसे माणगाव तालुकाध्यक्ष प्रतीक रहाटे, शिवसेना शहरप्रमुख अजित तारळेकर, तालुका युवासेना अधिकारी कपिल गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष गणेश चव्हाण, माजी उपसरपंच राजेश मेहता, अनंता थळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सचिन देसाई, सिद्धांत देसाई, सुनील पवार, सुमित काळे आदींसह नगरपंचायत हद्दीतील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0