पैसे पडल्याचे सांगून लांबवली 2 लाखांची रक्कम

दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

By Raigad Times    15-Nov-2021
Total Views |

theft crime_1   
 
तळोजा पोलिसांकडून शोध सुरु
 
पनवेल । पैसे पडल्याचे सांगून दिशाभूल करणार्‍या दोघा चोरट्यांनी एका व्यक्तीजवळ असलेली तब्बल 2 लाख रुपयांची रोख रक्कम व इतर कागदपत्रे असलेली पिशवी लांबविल्याची घटना तळोजा येथे घडली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
 
या घटनेतील पारदार चंद्रकांत पाटील (40) हे तळोजा येथील वलप भागात राहण्यास असून त्याच ठिकाणी त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. पाटील यांना आपल्या दुकानाची दुरुस्ती करायची असल्याने ते तळोजा एमआयडीसीतील एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते.
 
पाटील यांनी बँकेतून 2 लाख रुपये काढल्यानंतर सदर रक्कम घेऊन ते बँकेच्या बाहेर आले. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम, चेक बुक, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, बजाज फायनान्स कार्ड, बँकेचे पासबुक एटीएम कार्ड असलेली पिशवी मोटारसायकलच्या हँडलला अडकवून मोबाईल फोनवर बोलत उभे होते.
 
याचवेळी त्याठिकाणी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी पाटील यांना त्यांचे पैसे पडल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली. यावेळी चंद्रकांत पाटील खाली पडलेल्या नोटा उचलण्यासाठी गेले असतानाच मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी पाटील यांनी मोटारसायकलला अडकवलेली रोख रक्कम व इतर कागदपत्रे असलेली पिशवी घेऊन पलायन केले.
 
त्यानंतर पाटील आपल्या मोटारसायकलजवळ आले असता, त्यांना मोटारसायकलच्या हँडलला अडकविलेली रोख रक्कमेची पिशवी निदर्शनास आली नाही. त्यानंतर पैसे पडल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करणार्‍या दोघा चोरट्यांनीच सदरची पिशवी चोरुन नेल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
 
याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.